आठवणीचा ठेवा जपत, ‘तो’ आला अस्थी विसर्जनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST2021-03-09T04:10:33+5:302021-03-09T04:10:33+5:30

भिवापूर :- ‘ते’ दोघेही भिवापूरचे. शहीद मंगेश इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसमध्ये तर ‘तो’ बीएसएफ मध्ये कर्तव्य बजावत आहे. सुट्यांमध्ये दोघेही ...

Remembering, ‘he’ came to bone immersion | आठवणीचा ठेवा जपत, ‘तो’ आला अस्थी विसर्जनाला

आठवणीचा ठेवा जपत, ‘तो’ आला अस्थी विसर्जनाला

भिवापूर :- ‘ते’ दोघेही भिवापूरचे. शहीद मंगेश इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसमध्ये तर ‘तो’ बीएसएफ मध्ये कर्तव्य बजावत आहे. सुट्यांमध्ये दोघेही गावाला आले की आपापले अनुभव आणि तेथील परिस्थिती कथन करायचे. शुक्रवारी छत्तीसगडच्या कोहकामेटा जंगलात मंगेशला वीरमरण आले. अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येत जनसागर उसळला होता. मात्र यात त्याचा सैनिक मित्र नव्हता. दरम्यान, रविवारी (दि.७) सकाळीच ‘तो’ भिवापूर पोहोचला आणि मोक्षधामावर दाखल होत त्याने शहीद मंगेशच्या अस्थीचे अंतिम दर्शन घेतले. सैनिकी पोशाखात सॅल्यूट केला. हा क्षण सैनिकी नात्यांचे भावपूर्ण दर्शन घडविणारा होता. प्रभाकर खांडेकर असे या सैनिक मित्राचे नाव आहे. शहीद मंगेश व प्रभाकर हे दोघेही भिवापूरचे आहेत. शहीद मंगेश २००७ मध्ये इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसमध्ये दाखल झाला. प्रभाकर हा २००० मध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये दाखल झाला. भिवापूरचे हे दोन्ही सुपुत्र आपापल्या कर्तव्यस्थळी कुठे दहशतवाद्यांशी तर कुठे नक्षलवाद्यांशी दोन हात करीत देशाचे रक्षण करीत होते. दरम्यान, शुक्रवारी छत्तीसगडच्या कोहकामेटा जंगलात शहीद मंगेश व त्याचे सहकारी कोम्बिंग ऑपरेशन करीत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंग स्फोटात आयटीबीपीचा जवान मंगेश रामटेके (४०) शहीद झाला. याची माहिती मिळताच त्याचा सैनिक मित्र प्रभाकरला धक्का बसला. शहीद मंगेशच्या पार्थिव शरीराचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. मात्र कर्तव्यस्थळावरून वेळेत भिवापूरला पोहोचण्यासाठी साधन मिळत नव्हते. अखेरीस बसने रात्रभराचा संपूर्ण प्रवास करीत रविवारला (दि.७) सकाळी प्रभाकर भिवापूरला पोहोचला. त्यानंतर थेट मोक्षधामावर जात शहीद मंगेशच्या अस्थीचे अंतिम दर्शन घेतले. शहीद मंगेशची पत्नी राजश्री, मुलगा तक्ष व आई-वडील यांचे प्रभाकरने सांत्वन केले. प्रभाकर गत दोन वर्षापासून इंदूर येथील बीएसएफच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये कर्तव्य बजावत आहे. दरम्यान, माजी मंत्री व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सोमवारी भिवापूर गाठत शहीद मंगेशच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शहीद मंगेशच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Remembering, ‘he’ came to bone immersion