...तर कायमचा मास्क वापरण्याची येईल वेळ; नागपूरसह विदर्भातील ४ शहरांच्या हवेत घातक सल्फर व नायट्रोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 14:10 IST2023-01-31T14:00:09+5:302023-01-31T14:10:52+5:30
नागपूर, चंद्रपूरच्या लाेकांवर एनओ-टू, एसओ-टूचे संकट : गाेंदिया, अमरावतीसह मुंबईकरही प्रभावित

...तर कायमचा मास्क वापरण्याची येईल वेळ; नागपूरसह विदर्भातील ४ शहरांच्या हवेत घातक सल्फर व नायट्रोजन
निशांत वानखेडे
नागपूर :विदर्भातील नागपूर व चंद्रपूरसह गाेंदिया व अमरावतीच्या वातावरणात सल्फर डायऑक्साइड (एसओ-२) व नायट्राेजन डायऑक्साइड (एनओ-२) चा स्तर प्रचंड वाढला आहे. कोपर्निकस ॲटमॉस्फिअर मॉनिटरिंग सर्व्हिस उपग्रहाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाचे चित्र जारी केले असून आर्थिक राजधानी मुंबईसुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात आहे. याच कारणामुळे सध्या या शहरांमध्ये श्वसनाचे, फुफ्फुसाचे विकार, अस्थमा व त्वचेचे आजार वाढले असून कायमस्वरूपी मास्क घालण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी भीती डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे.
देशात आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या औष्णिक वीज केंद्रामधून राखेची धूळ मोठ्या प्रमाणावर हवेत सोडली जाते. त्यात एनओ-२, एसओ-२चे प्रमाण प्रचंड असते. ही राख हवेच्या दिशेने वाहत जाते व त्या भागाला प्रभावित करते. अवकाशातून घेतलेल्या उपग्रह चित्राद्वारे नागपूर आणि चंद्रपूर ही शहरे दाेन्ही वायूंच्या बाबतीत अत्याधिक प्रदूषित तर गाेंदियाच्या वातावरणात सल्फर डायऑक्साइड आणि अमरावतीमध्ये नायट्राेजन डायऑक्साइडचा लाल थर जमा झालेला दिसताे. याशिवाय मुंबईच्या आसपासचा परिसरातही एसओ-२, एनओ-२ वायूचा स्तर वाढल्याचे या उपग्रह सर्वेक्षणात दिसून येत आहे.
एसओ-२ वायू काेळसा आणि क्रूड ऑइलच्या ज्वलनातून बाहेर पडताे. एनओ-२ हा वायूसुद्धा वीज केंद्र आणि वाहनांच्या धुरातून बाहेर पडताे. देशात २०० च्यावर औष्णिक वीज केंद्र आहेत, ज्यातील २० प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. एका माेठ्या प्रकल्पामधून दरराेज ५०० टनांच्या जवळपास वायू हवेत फेकला जातो. यामुळे विदर्भात आम्लवर्षा (ॲसिड रेन) हाेण्याचा धाेका वाढला आहे. पाण्यातील आम्लता वाढते. त्याचे गंभीर परिणाम जलीय जीव आणि वनस्पतींवर होतात. वृक्ष, जंगल आणि शेतीही प्रभावित हाेते.
आराेग्यावर घातक परिणाम
- एनओ-२, एसओ-२ चा स्तर वाढल्याने श्वासनलिकेची प्रतिकार शक्ती कमी हाेते. यामुळे सामान्य लाेकांमध्ये भविष्यात फुप्फुसासंबंधी आजार बळावण्याची शक्यता असते.
- आधीपासूनच दमा, अस्थमासारखे श्वसनाचे आजार असलेल्यांचा त्रास अत्याधिक बळावताे.
- लाेकांमध्ये डाेळे व त्वचेसंबंधीचे आजारही वाढल्याचे दिसून येत आहे.
- या अतिविषारी वायूची स्थिती अशीच राहिली तर लाेकांना कायमचा मास्क घालण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
- डाॅ. समीर अर्बट, पल्माेनाॅलाॅजिस्ट
सरकारने औष्णिक वीज केंद्रासाठी फ्युअल गॅस डिसल्फरायझेशन (एफजीडी), बर्नर डिझाइन चेंज, ईएसपी यासारख्या यंत्रणा लावण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, बहुतेक वीज केंद्रांत त्या नाहीत किंवा असलेल्या ठिकाणी बंद किंवा नादुरुस्त आहेत.
- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण, हवामान अभ्यासक