वेलांटी, मात्रा चुकल्याने बोगसपणा उघड; शिक्षण घोटाळ्यात बोगस कागदपत्रे बनविणारा अखेर सापडला
By योगेश पांडे | Updated: April 17, 2025 22:50 IST2025-04-17T22:50:07+5:302025-04-17T22:50:20+5:30
मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणात सहावी अटक

वेलांटी, मात्रा चुकल्याने बोगसपणा उघड; शिक्षण घोटाळ्यात बोगस कागदपत्रे बनविणारा अखेर सापडला
नागपूर : बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याच्या प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. या प्रकरणात बोगस कागदपत्रे बनविणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपी हा गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे शिक्षक आहे. त्याच्या अर्धवट ज्ञानामुळे त्याने बनावट कागदपत्रे बनविताना शुल्लक चुका केल्या व तो पोलिसांच्या रडारवर आला. त्याला गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली.
आरोपी मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना सरळ मुख्याध्यापक बनविण्यात आले. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय जेवताळा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली. या प्रकरणांमध्ये सदर पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड यांच्यासोबत पाच जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात पोलिसांनी पुडके व नरडची चौकशी केली व त्यात गोंदियातील अर्जुनी मोरगाव येथील न्यू मॉडेल स्कूलचा शिक्षक महेंद्र भाऊराव म्हैसकर (४४, आवळेनगर, टेकानाका) याचे नाव समोर आले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता म्हैसकर यानेच या प्रकरणात बोगस कागदपत्रे तयार करून दिल्याची बाब समोर आली. पोलिसांनी म्हैसकरला गुरुवारी अटक केली. या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.
शिक्षक असूनदेखील व्याकरणाच्या चुका, अलगद अडकला
मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणात आवश्यक असलेली कागदपत्रे बनावट पद्धतीने म्हैसकरने तयार करून दिली होती. मात्र शिक्षक असूनदेखील लेटरपॅड तयार करताना तसेच इतर दस्तावेजांवर वेलांटी, मात्रा अशा शुल्लक व्याकरणाच्या चुका त्याने केल्या होत्या. त्यामुळे तो सहजपणे अनेकांच्या नजरेत आला.