जाती व्यवस्था व असमानता दूर केल्याशिवाय शांतता अशक्य

By Admin | Updated: May 13, 2014 00:54 IST2014-05-13T00:54:37+5:302014-05-13T00:54:37+5:30

समाजातून जाती व्यवस्था आणि असमानता दूर होत नाही तोपर्यंत सरकार कोणाचेही असो देशात शांतता नांदणार नाही, असे प्रतिपादन विख्यात लेखिका व विचारवंत अरुंधती रॉय यांनी येथे केले.

Peace impossible without removing caste system and inequality | जाती व्यवस्था व असमानता दूर केल्याशिवाय शांतता अशक्य

जाती व्यवस्था व असमानता दूर केल्याशिवाय शांतता अशक्य

नागपूर : समाजातून जाती व्यवस्था आणि असमानता दूर होत नाही तोपर्यंत सरकार कोणाचेही असो देशात शांतता नांदणार नाही, असे प्रतिपादन विख्यात लेखिका व विचारवंत अरुंधती रॉय यांनी येथे केले.

इंडिया पीस सेंटर आणि हिस्लॉप कॉलेज, दीनबंधू शिक्षण संस्था आणि सत्यशोधक इंटरनॅशनल यांच्या संयुक्तवतीने अरुंधती रॉय यांचे हिस्लॉप कॉलेजच्या सभागृहात प्रॉस्पेक्टस् ऑफ पीस इन पोस्ट पोल इंडिया’ (निवडणुकीनंतर भारतातील शांततेचे भवितव्य) या विषयावर भाषण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना व घडामोडींचा हवाला देत रॉय यांनी त्यांचे वरील मत मांडले. जात नष्ट केल्याशिवाय शांतता निर्माण होणारच नाही. देशात निर्माण झालेली विषमता हे सुद्धा यासाठी महत्त्वाचे कारण आहे. आज समाजात मूठभर लोकांची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली असून, समाजातील मोठा वर्ग गरीब होत चालला आहे. श्रीमंत मूठभर वर्गाकडे देशातील संपूर्ण शक्ती केंद्रित झाली आहे. देशाची धोरणे काय असावीत, कोण सत्तेवर यावे, हे तेच लोक ठरवू लागले आहेत. सर्वसामान्य जीवनातील प्रत्येक गोष्टीवर ते त्यांचे वर्चस्व निर्माण करू पाहात आहे, हे धोक्याचे आहे व ते थांबविण्याची गरज आहे, असे रॉय म्हणाल्या.

अयोध्येतील वादग्रस्त वास्तूचे दार उघडणे आणि खुल्या अर्थव्यवस्थेला परवानगी देणे, या दोन बाबींमुळे संपूर्ण देशातील वातावरणच बिघडले. देश जातीयतेसोबतच असमानतेच्या खाईत लोटल्या गेला. त्यातून निर्माण झालेला द्वेष आणि असमानता अद्यापही कायम आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

लोकशाहीत फक्त निवडणुकाच महत्त्वाच्या नसतात तर लोकांच्या प्रश्नांनाही महत्त्वाचे स्थान असते. आजही भारतासारख्या विशाल देशात कुपोषण आहे. दलित आणि आदिवासींवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे. या लोकांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांतता कशी नांदेल, असा सवालही त्यांनी केला. व्यासपीठावर रॉजर गायकवाड, सुरेश खैरनार आणि सुनील सरदार उपस्थित होते. त्यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास झाला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुपंथ भट्टाचार्य यांनी केले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Peace impossible without removing caste system and inequality