पटेल-पटोले वाद! आघाडीची पुन्हा एकदा लागली वाट; गोंदिया-भंडाऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 08:00 AM2022-05-11T08:00:00+5:302022-05-11T08:00:12+5:30

Nagpur News राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील जुन्या वादाने पुन्हा एकदा आघाडी धर्माची वाट लावल्याचे पहायला मिळाले.

Patel-Patole argument! Wait for the lead once again; Congress-NCP rift in Gondia-Bhandara | पटेल-पटोले वाद! आघाडीची पुन्हा एकदा लागली वाट; गोंदिया-भंडाऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट

पटेल-पटोले वाद! आघाडीची पुन्हा एकदा लागली वाट; गोंदिया-भंडाऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट

Next
ठळक मुद्दे गोंदियात भाजपला राष्ट्रवादी साथ भंडाऱ्यात काँग्रेसने भाजपचा गट फोडला

कमलेश वानखेडे

नागपूर : भाजपकडून होणाऱ्या हल्ल्यांचा एकजुटीने सामना करण्याच्या गप्पा राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मारत असले तरी भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षात फाटाफूट झाली. राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील जुन्या वादाने पुन्हा एकदा आघाडी धर्माची वाट लावल्याचे पहायला मिळाले. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना झालेल्या या घटनाक्रमामुळे निवडणुकीनंतरही हे दोन पक्ष एकत्र येतील का, अशी शंका निर्माण झाली आहे.

भंडारा-गोंदियातील पटेल-पटोले वाद काही नवा नाही. खूप कमी प्रसंगात दोन्ही नेते एकत्र आले आहेत. मात्र, एकमेकांवर मात देण्याची संधी दोन्ही नेत्यांनी क्वचितच दवडली असेल. भंडारा- गोंदिया जिल्हा परिषदेचे निकाल आले तेव्हाच एकमेकांचे प्रस्थ मोडित काढण्यासाठी गोलमाल होईल, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. गोंदियात दोन अपक्षांची साथ मिळाल्याने तशीही भाजपच बहुमतात होती. मात्र, त्यानंतरही गोंदियात भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतले. भंडाऱ्यात काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र आली असती तर आघाडी धर्म पाळल्या गेला असता. मात्र, नेतेच आपसात बसले नाहीत. येथे पटोलेंनी राष्ट्रवादीला दूर सारत भाजपचे माजी आ. चरण वाघमारे यांच्या मदतीने भाजपच्याच ५ सदस्यांचा गट फोडला व सत्ता स्थापन केली. काँग्रेसने आघाडीधर्म मोडला व अध्यक्षपद मिळवले.

- निरीक्षक म्हणून गेले बावनकुळे फेल 

- भाजपला राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेसच्या हातून सत्ता खेचायची होती. त्यामुळेच इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये निपुण असलेले प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडाऱ्यात निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. बावनकुळे भंडाऱ्यात डेरेदाखल होते. मात्र, भाजपला फुटण्यापासून रोखण्यात ते ही फेल ठरले. काँग्रेसनेही नागपूरहून प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांना निरीक्षक म्हणून पाठविले होते, हे विशेष.

चरण वाघमारेंची नाराजी आ. फुकेंवर 

- भंडाऱ्याचे माजी आ. चरण वाघमारे यांचा गट फुटला, त्यामुळे काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. भाजपला याची कुणकुण आधीच लागली होती. वाघमारे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपुरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आ. परिणय फुके यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त केली होती. मोहाडी नगर परिषद व तुमसर पंचायत समितीमध्ये फुके यांनी दगाबाजी करण्याचे प्रयत्न केले, अशी तक्रार आपण फडणवीस यांच्याकडे केली होती, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. सत्तेसाठी राष्ट्रवादीसोबत जाण्यास आपला विरोध होता. त्यामुळे शेवटी आपल्याला टोकाची भूमिका घ्यावी लागली, असे चरण वाघमारे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: Patel-Patole argument! Wait for the lead once again; Congress-NCP rift in Gondia-Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.