जादूटोण्याच्या संशयावरून एकाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:07 IST2021-09-25T04:07:50+5:302021-09-25T04:07:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जादूटोण्याच्या संशयावरून एका आरोपीने त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी ...

One beaten to death on suspicion of witchcraft | जादूटोण्याच्या संशयावरून एकाला बेदम मारहाण

जादूटोण्याच्या संशयावरून एकाला बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जादूटोण्याच्या संशयावरून एका आरोपीने त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ही घटना घडली. मोहम्मद शहानवाज मोहम्मद इस्त्राईल (वय २४, रा. नूर मोहल्ला), असे फिर्यादीचे, तर शेख साबीर शेख समद (वय ३४, रा. सुरेंद्रगड), असे आरोपीचे नाव आहे.

शहानवाज आणि साबीर हे दोघेही मित्र आहेत. आरोपी साबिर बिल्डिंग मटेरिअलचे काम करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे काम ठिकठाक चालत नसल्याने त्याला संशयाने पछाडले आहे. शहानवाज नेहमी मिठा निम दर्गाह येथे दर्शनाला जातो. त्यामुळे तो आपल्यावर जादूटोणा करीत असावा, असा संशय काही दिवसांपासून साबीरला येत होता. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीत कटुताही आली आहे. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास साबीर त्याच्या दुचाकीने दाभा रोडने जात असताना पेट्रोल पंपाजवळ त्याची दुचाकी स्लीप होऊन तो खाली पडला. त्यावेळी शहानवाज तेथेच उभा होता. त्यामुळे त्यानेच टोटका (जादूटोणा) केला असावा, असा संशय घेऊन साबीरने शहानवाजसोबत वाद घातला. तू काही केले असेल म्हणूनच दुचाकीवरून खाली पडलो, असे म्हणत शहानवाजला बेदम मारहाण केली. त्यामुळे शहानवाजच्या डोळ्याखाली गंभीर इजा झाली. आजूबाजूची मंडळी धावली आणि त्यांनी आरोपीला आवरले. त्यानंतर शहानवाजने गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी साबीरविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: One beaten to death on suspicion of witchcraft