नवेगाव-नागझिऱ्यात अडथळ्यांनी रोखली वाघांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:19 PM2021-03-04T12:19:51+5:302021-03-04T12:21:09+5:30

Nagpur News ताडोबा, पेंचमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाघ असताना याच प्रदेशातील नवेगाव-नागझिऱ्याच्या जंगलात मात्र वाघांची वानवा आहे. घनदाट वनक्षेत्र असूनही वाघांची संख्या केवळ ८ असल्याने आश्चर्य व्यक्त होणे साहजिक आहे.

Obstacles in Navegaon-Nagzira prevented tigers from waiting | नवेगाव-नागझिऱ्यात अडथळ्यांनी रोखली वाघांची वाट

नवेगाव-नागझिऱ्यात अडथळ्यांनी रोखली वाघांची वाट

Next
ठळक मुद्देघनदाट अभयारण्यात सर्वात कमी वाघ गाव, रस्ते अन्‌ रानकुत्रेही विरोधक

निशांत वानखेडे

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : विदर्भातील जंगल वाघांसाठी नंदनवनच. म्हणूनच या प्रदेशातील वनक्षेत्रात वाघांची घनता देशात सर्वांत जास्त आहे आणि नुकत्याच आलेल्या व्याघ्र वाढीच्या अहवालात त्यावर शिक्कामोर्तबही झाले. मात्र, विदर्भातीलच एक अभयारण्य वाघाला फारसे भावलेले दिसत नाही. ताडोबा, पेंचमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाघ असताना याच प्रदेशातील नवेगाव-नागझिऱ्याच्या जंगलात मात्र वाघांची वानवा आहे. घनदाट वनक्षेत्र असूनही वाघांची संख्या केवळ ८ असल्याने आश्चर्य व्यक्त होणे साहजिक आहे.

ताडोबा अभयारण्यात वाघांची संख्या २०० वर पोहोचली असून, येथील वनक्षेत्र वाघांसाठी कमी पडत आहे. पेंचमध्येही बऱ्यापैकी संख्या वाढली आहे. मात्र, ६५० चौरस किलोमीटरच्या वर असलेल्या नवेगाव-नागझिऱ्यात केवळ ८ वाघ आहेत. यामागे अनेक कारणे असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. नवेगाव-नागझिरा अभयारण्याचे फिल्ड डायरेक्टर रामानुजम यांनी सांगितले, ताडोबा अभयारण्य हे एकत्रित (कॉम्पॅक्ट) आहे आणि बफर झोनमध्ये मानवी वस्त्या तुटक असल्याने वाघांना अधिवासासाठी मोठा एरिया मिळतो. याउलट एकत्रित उल्लेख होत असला तरी नवेगाव-नागझिरा एकत्रित व समुचित नाही. २५० चौ.कि.मी.चा नवेगाव ब्लॉक वेगळा, तर ४०० चौ.कि.मी.चा नागझिरा ब्लॉक वेगळा पडतो. विशेष म्हणजे या दोन्ही ब्लॉकच्या मध्ये असलेल्या बफर एरियामध्ये तब्बल १८५ गावे आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या मानवी वस्त्या हा वाघांच्या अधिवासाचा मोठा अडथळा आहे. याशिवाय अधिवासात विविध विकासकामे, तसेच रेल्वे व रस्त्यांचे जाळे मोठे असल्यानेही वाघांसाठी अडचणीचे हाेत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हे अभयारण्य लहान-मोठ्या टेकड्यांनी व्यापले आहे. जंगलात तृणभक्षी प्राण्यांची संख्या चांगली आहे; पण कदाचित अधिवास कमी पडत असल्यानेच वाघांची संख्या कमी असण्याची शक्यता आहे. इतर भागातील वाघ या अभयारण्यात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव आला होता; पण याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तृणभक्षी प्राण्यांची गणना नाही

जंगलातील तृणभक्षी प्राण्यांची अशी गणना झाली नाही, केवळ अंदाजानेच ती सांगितली जाते. नागझिऱ्यामध्ये सांबराची संख्या खूप आहे; पण नवेगावमध्ये नाही. हरिण व नीलगायही आढळून येतात; पण त्यांची नेमकी संख्या सांगता येणार नाही.

- रानकुत्रे उठले वाघांच्या जिवावर?

नवेगाव-नागझिरा अभयारण्यात रानकुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रानकुत्र्यांमुळेच या जंगलात वाघांची संख्या कमी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत तज्ज्ञांद्वारे अभ्यास सुरू असून, अंतिम अहवाल आल्याशिवाय त्याबाबत काही सांगता येणार नाही, असे रामानुजम यांनी स्पष्ट केले.

या जंगलात वाघांची संख्या पूर्वीपासूनच कमी आहे. कदाचित हा अधिवास कमी पडत असेल किंवा रानकुत्र्यांमुळेही वाघांना धोका होत असेल. मात्र, याबाबत सखोल अभ्यास व्हावा आणि संख्या वाढविण्याच्या दिशेने वनविभाग व राज्य शासनाने कार्य करावे, अशी आमची इच्छा आहे.

- नितीन देसाई, वन्यजीव अभ्यासक

Web Title: Obstacles in Navegaon-Nagzira prevented tigers from waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.