नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्प हा विदर्भातील जलसिंचनाच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रकल्प आहे. यामुळे शेती उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. नियमानुसार कार्यवाही करीत जिगाव प्रकल्पातील अडथळे लवकरच दूर करण्याचा प्रयत्न असणार आहे. या अनुषंगाने मुंबईत २९ एप्रिल रोजी सविस्तर आढावा बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी संबंधित यंत्रणेला दिले.नियोजन भवन येथे जिगांव प्रकल्पाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर जिगांव प्रकल्पाच्या सद्यस्थितीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील, सहआयुक्त वैशाली पाथरे, उच्च न्यायालयाचे सरकारी अभियोक्ता देवेन चव्हाण, उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे सचिव अनिलकुमार शर्मा यांच्यासह संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.विदर्भातील खारपाण पट्ट्यातील अवर्षण प्रवण शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. औद्योगिक व पिण्यासाठी पाण्याचे शाश्वत स्त्रोत पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील गावांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. त्यामुळे विदर्भातील जलसिंचनाच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यात येईल, असे बावनकुळे यावेळी म्हणाले.
बुलडाण्यातील जिगांव प्रकल्पातील अडथळे दूर होणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
By आनंद डेकाटे | Updated: April 24, 2025 02:06 IST