गाड्यांमधून स्फोटक फटाक्यांची वाहतूक संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष : बेफिकरीमुळे घडू शकतो अनर्थ
By नरेश डोंगरे | Updated: October 7, 2025 23:08 IST2025-10-07T23:08:03+5:302025-10-07T23:08:25+5:30
Nagpur News: स्फोटक आणि ज्वलनशिल चिजवस्तूंच्या वाहतुकीवर प्रतिबंध असतानादेखिल रेल्वे गाड्या, बसेस आणि अन्य वाहनांमधून सर्रास फटाक्यांची वाहतूक होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे, कारवाईचा अधिकार असणाऱ्या मंडळीकडून या धोकादायक प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने अनर्थ होण्याची भिती व्यक्त होत आहे.

गाड्यांमधून स्फोटक फटाक्यांची वाहतूक संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष : बेफिकरीमुळे घडू शकतो अनर्थ
- नरेश डोंगरे
नागपूर - स्फोटक आणि ज्वलनशिल चिजवस्तूंच्या वाहतुकीवर प्रतिबंध असतानादेखिल रेल्वे गाड्या, बसेस आणि अन्य वाहनांमधून सर्रास फटाक्यांची वाहतूक होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे, कारवाईचा अधिकार असणाऱ्या मंडळीकडून या धोकादायक प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने अनर्थ होण्याची भिती व्यक्त होत आहे.
रेल्वे गाड्या, बसेस किंवा दुसऱ्या कोणत्याही सार्वजनिक परिवहनाच्या माध्यमातून स्फोटक आणि ज्वलनशिल चिजवस्तूंची वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे. रेल्वे गाड्यांमध्ये बारूद, फटाके किंवा कोणत्याच प्रकारची स्फोटके, सिलिंडर, पेट्रोल अथवा रॉकेल तसेच स्टोव्हची वाहतूक करणारावर रेल्वे अॅक्टच्या कलम १६४ अन्वये कडक कारवाई केली जाते. मात्र, असे असूनही रेल्वे गाड्यांमध्ये अनेक जण लपून छपून स्फोटकांची, फटाक्यांची तसेच प्रतिबंधित चिजवस्तूंची वाहतूक करतात. त्यांच्या या धोकादायक कृतीमुळे रेल्वे गाड्यांमध्ये आग लागून स्फोट घडल्याच्याही घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या जानमालाची हानी झाली आहे. मात्र, तरीदेखिल अनेक समाजकंटक तसेच बेजबाबदार मंडळी गाड्यांमधून लपून छपून अशा धोकादायक पदार्थांची, चिजवस्तूंची वाहतूक करतात. फेस्टीव्ह सिजनमध्ये हे प्रकार वाढतात.
दिवाळीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात फटाके फोडून आतिषबाजी केली जात असल्याने प्रदुषण वाढते. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे सामाजिक संस्था, संघटना फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करतात. घरची जाणकार मंडळीही फटाक्यास मनाई करतात. मात्र, कितीही मनाई केली किंवा आवाहन केले तरी दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके उडवले जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी आगी लागतात आणि अनेकांना भाजल्यामुळे दुखापतही होते. आता दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे अनेक फटाके विक्रेते मोठ्या शहरातून फटाके विकत घेऊन आपल्या गावात नेऊन विकतात. ही मंडळी फटाक्यांची वाहतूक करण्यासाठी चक्क रेल्वे गाड्या, बस, ट्रॅव्हल्सचा बेमालूमपणे वापर करीत आहे.
पिशव्या आणि बॅगमध्ये फटाके
छोट्या-मोठ्या पिशव्या आणि बॅगमधून फटाक्यांची वाहतुक केली जाते. मोठ्या शहरातील रेल्वे स्थानकावर पकडले जाण्याचा धोका असल्याने ही मंडळी छोट्या, आडवळणाच्या ठिकाणी उतरतात आणि मागच्या भागाने निघून जातात. बस आणि ट्रॅव्हल्ससह ऑटो तसेच दुसऱ्या काही वाहनांचाही फटाक्याच्या वाहतुकीसाठी वापर केला जात आहे. संबंधित मंडळीचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एखादवेळी मोठा धोका होण्याची भिती व्यक्त होत आहे.
या प्रकाराची आम्ही गंभीर दखल घेत आहोत. कोणत्याही ज्वलनशिल अथवा स्फोटक पदार्थांची तस्करी, वाहतूक करणारांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले असून, कारवाईसाठी विशेष पथके कामी लावण्यात आली आहेत.-दीपचंद्र आर्य
विभागीय सुरक्षा आयुक्त, दपूम रेल्वे नागपूर.