नागपूर मनपात पकोड्यावरून राजकारण तापले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:09 IST2018-02-13T00:05:44+5:302018-02-13T00:09:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पकोडे विकणे हाही रोजगार असल्याबाबतचे वक्तव्य केल्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत देशभरात आंदोलन करीत आहेत. नागपूर महापालिकेतही या मुद्यावरून विरोधकांनी सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे.

नागपूर मनपात पकोड्यावरून राजकारण तापले !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पकोडे विकणे हाही रोजगार असल्याबाबतचे वक्तव्य केल्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत देशभरात आंदोलन करीत आहेत. नागपूर महापालिकेतही या मुद्यावरून विरोधकांनी सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी मुंबई प्रांतिक महानगरपालिका (सुधारित) व नागपूर शहर महापालिका (निरसन) अधिनियम २०११ मधील कलम ४४ अन्वये प्रश्न उपस्थित करून शहरातील बेरोजगारांना पकोड्याचा व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी निगम सचिव हरीश दुबे यांना सोमवारी पत्र दिल्याने सत्तापक्षात खळबळ उडाली आहे.
सहारे यांचे पत्र प्राप्त होताच सभागृहात हा विषय चर्चेला येणार नाही. यासाठी सत्तापक्ष सक्रिय झाला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारावयाचा झाल्यास सात दिवसाआधी देणे अपेक्षित आहे. २०फे ब्रुवारीला सभागृह आहे. सहारे यांचा प्रश्न सात दिवसाआधी आल्याने सचिवांना तो नाकारता येणार नाही. त्यामुळे प्राथमिकतेच्या आधारावर हा प्रश्न नाकारण्याची शक्यता आहे.
भाजपाचे काही ज्येष्ठ नगरसेवक यासाठी कामाला लागले आहे. नागपूर शहरात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. त्यांना रोजगार करता यावा यासाठी महापालिकेच्या खाली जागा, बाजारातील जागा वा फुटपाथ उपलब्ध करावे अशी सहारे यांची मागणी आहे.
जिल्ह्यात दोन लाख बेरोजगार
कामाच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगारासाठी समुपदेशन, मार्गदर्शन व मदत करण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातून (शहर व ग्रामीण) तब्बल २ लाख १ हजार ४०७ जणांनी बेरोजगार असल्याची नोंद नागपुरातील मार्गदर्शन केंद्रात केली आहे. यात ७१ हजार ६७२ महिलांचाही समावेश आहे़. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतची ही आकडेवारी आहे.