नागपूर जिल्हा: शिवसेना व राष्ट्रवादीपुढे यंदा खाते उघडण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 02:33 AM2019-07-22T02:33:51+5:302019-07-22T06:14:06+5:30

भाजपचा धूमधडाका तर काँग्रेसची धडपड : जागा अदलाबदलीवरून युतीत पेच, भाजपच्या आमदारांमध्ये उमेदवारीविषयी धाकधूक

Nagpur District: Challenge of opening this account for Shivsena and NCP this year | नागपूर जिल्हा: शिवसेना व राष्ट्रवादीपुढे यंदा खाते उघडण्याचे आव्हान

नागपूर जिल्हा: शिवसेना व राष्ट्रवादीपुढे यंदा खाते उघडण्याचे आव्हान

Next

कमलेश वानखेडे 

नागपूर : जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी ११ जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यामुळे भाजप उत्साही आहे, तर एकमेव जागा असलेली काँग्रेस तग धरण्यासाठी धडपड करीत आहे. गेल्यावेळी स्वबळावर लढलेल्या व पदरी भोपळा आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीचा यावेळी खाते उघडण्यासाठी कस लागणार आहे. पराभवानंतरही काँग्रेसमधील गटबाजी शमलेली नाही. दुसरीकडे युती झाल्यास जिल्ह्यातील काही जागांच्या अदलाबदलीवरून भाजप-सेनेत पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेला पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, काटोल, रामटेक व सावनेर अशा चार ते पाच जागा हव्या आहेत. या पाचही जागांवर सध्या भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे भाजप एखाद दुसरी जागा वगळता मागे हटण्याची चिन्हे नाहीत. २००९ मध्ये राष्ट्रवादीला हिंगणा व काटोल या दोनच जागा मिळाल्या व त्या जिंकल्याही. त्यामुळे यावेळी कामठी किंवा उमरेड तसेच पश्चिम नागपूर किंवा उत्तर नागपूरची जागा काँग्रेसने सोडावी, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे.

भाजप विद्यमान आमदारांची फौज पुन्हा रिंगणात उतरवेल. पण शिवसेनेशी होणारी तडजोड व पक्षांतर्गत दावेदारी पाहता एखाद दुसऱ्या आमदाराचे तिकीट कापण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नव्हे तर प्रसंगी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मोठा मासा गळाला लागला तर आणखी एखाद्या आमदाराला नारळ दिले जाऊ शकते. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या बहुतांश विद्यमान आमदारांमध्ये धाकधूक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात फारसे आव्हान नाही. येथे काँग्रेसकडून नगरसेवक प्रफुल्ल गुडधे वगळता दुसरे कुणी इच्छुकही नाही. पश्चिम नागपुरात भाजपचे आ. सुधाकर देशमुख यांच्या जागेवर नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, नरेश बरडे आदी इच्छुक आहेत. काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे पुन्हा इच्छुक आहेत.

दक्षिण नागपुरात आ. सुधाकर कोहळे यांच्यासह माजी आमदार मोहन मते यांनी जोरात प्रयत्न चालविले आहे. काँग्रेसमधून बडतर्फ माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत हे नुकतेच शिवसेनेत दाखल झाले असून, त्यांनीही दक्षिणवर दावा केला आहे.
मध्य नागपुरात आ. विकास कुंभारे यांच्यासह माजी महापौर प्रवीण दटके यांनीही दावा केला आहे. येथे काँग्रेसमधील इच्छुकांची यादी लांबलचक आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर नागपुरात भाजपचे मताधिक्य घटल्यामुळे आ. डॉ. मिलिंद माने अडचणीत आहेत. मात्र, येथे काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी आहे. माजी मंत्री नितीन राऊत पुन्हा इच्छुक आहेत. पूर्व नागपुरात आ. कृष्णा खोपडे यांना पक्षांतर्गत आव्हान नाही. काँग्रेसकडून अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, प्रवक्ते अतुल लोंढे तर राष्ट्रवादीकडून गटनेते दुनेश्वर पेठे इच्छुक आहेत.

नागपूर ग्रामीणमध्ये काटोलमध्ये आशिष देशमुख यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा आता भाजप लढते की शिवसेनेला सुटते, याकडे लक्ष लागले आहे. येथे राष्ट्रवादीकडून माजी मंत्री अनिल देशमुख कामाला लागले आहेत. हिंगण्यात भाजपचे आ. समीर मेघे यांना पक्षात सध्यातरी पर्याय नाही. येथे राष्ट्रवादीकडून माजी मंत्री रमेश बंग व काँग्रेसकडून कुंदा राऊत इच्छुक आहेत. सावनेरमध्ये काँग्रेसचे आ. सुनील केदार यांना लक्ष्य करण्याची तयारी भाजपने चालविली आहे. गेल्यावेळी येथे शिवसेना थोड्याच फरकाने हरल्यामुळे यावेळी शिवसेना तिकिटासाठी आग्रही आहे.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यशैलीपुढे विरोधक हतबल आहेत. येथे काँग्रेसकडून अनेक जण तयारीत आहेत. रामटेकमध्ये भाजपचे आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांना तिकिटासाठी शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्याशी झुंज द्यावी लागेल. शिवसेना या जागेसाठी टोकाची भूमिका घेऊ शकते. काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक आहेत. उमरेडमध्ये भाजपचे आ. सुधीर पारवे यांच्या विरोधात पुन्हा एकदा काँग्रेसकडून डॉ. संजय मेश्राम व राजू पारवे इच्छुक आहेत. ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात वळविण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीत बसपाचा जोर ओसरला. वंचित आघाडीला मतदारांनी वंचितच ठेवले. त्यामुळे विधानसभेसाठी या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा कस लागेल.

सध्याचे बलाबल - भाजप ११ । शिवसेना ०० । काँग्रेस ०१। राष्ट्रवादी ००

२०१४च्या निवडणुकीत सर्वात मोठा विजय
दक्षिण-पश्चिम नागपूर : देवेंद्र फडणवीस एकूण मते : १,१३,९१८ फरक : ५८,९४२

सर्वात कमी मताधिक्क्याने पराभव
काटोल : अनिल देशमुख (राष्ट्रवादी) ५, ५५७ (विजयी : आशिष देशमुख, भाजप )

Web Title: Nagpur District: Challenge of opening this account for Shivsena and NCP this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.