लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मे महिन्यात प्रथमच नागपूरचेतापमान ४५ अंश सेल्सियसवर पोहोचल्याने शहर अक्षरशः उकाड्याने हैराण झाले आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात तिसऱ्यांदा पारा ४५ अंशांच्या पातळीवर पोहोचला असून हवामान विभागाने नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी १६ ते १९ मेदरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत थेट उन्हाच्या संपर्कात येणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व मध्यप्रदेशातून विदर्भ, मराठवाडा मार्गे कर्नाटकपर्यंत तसेच पश्चिम मध्यप्रदेशातून उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशपर्यंत दोन द्रोणिका सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून येत असून काही भागांत हलक्या सरीही पडत आहेत. मात्र, त्याचा उष्णतेवर कोणताही परिणाम दिसून येत नाही.
शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच नागपूरचे तापमान ४०.४ अंशांवर पोहोचले होते. दुपारी २.३० वाजता ते ४३.४ अंशांवर गेले आणि त्यानंतर अवघ्या एका तासात ४५ अंशांचा टप्पा गाठला. विशेष म्हणजे, आकाशात ढग असूनही उष्णतेची तीव्रता कायम राहिली. सूर्यास्तानंतरही उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते.
रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ झाली असून मागील २४ तासांत नागपूरचे किमान तापमान २.८ अंशांनी वाढून ३०.४ अंश सेल्सियसवर पोहोचले. याशिवाय वर्धा येथे ३१.९, अकोला येथे ३१.५ तर यवतमाळ येथे ३०.२ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, शुक्रवारी देशातील सर्वाधिक तापमान अमरावती येथे ४५.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. त्याखालोखाल वर्ध्यात ४५.५ आणि अकोल्यात ४५.४ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पारा ४५ अंश किंवा त्यापेक्षा अधिक नोंदविला गेला.
यंदाच्या हंगामातील सर्वाधिक उष्ण दिवसांमध्ये २६ एप्रिल रोजी ४५.४ अंश, २७ एप्रिल आणि १५ मे रोजी ४५ अंश तापमानाची नोंद झाली होती. हवामान तज्ज्ञांच्या मते, मे महिन्याचा उत्तरार्धही तीव्र उष्णतेच्या छायेत राहणार असून जून महिन्यातही उकाड्यापासून फारसा दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
Web Summary : Nagpur hits 45°C, prompting a yellow alert for Nagpur, Amravati, and Wardha from May 16-19 due to heatwave conditions. Citizens are advised to avoid midday sun exposure. Vidarbha experiences soaring temperatures with Amravati recording the highest at 45.6°C.
Web Summary : नागपुर का तापमान फिर 45 डिग्री सेल्सियस पर पहुंचा, जिससे नागपुर, अमरावती और वर्धा जिलों के लिए 16-19 मई तक येलो अलर्ट जारी किया गया है। नागरिकों को दोपहर में धूप से बचने की सलाह दी गई है। विदर्भ में अमरावती 45.6 डिग्री सेल्सियस के साथ सबसे गर्म रहा।