मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:52 IST2025-11-22T15:50:24+5:302025-11-22T15:52:13+5:30
Nagpur : शुक्रवारी सकाळच्या वेळी सिव्हिल लाइन्सची स्थिती सर्वात चिंताजनक होती, जिथे एक्यूआय २६१ पर्यंत पोहोचला होता. महाल भागात २५८ पातळीची नोंद झाली.

More pollution in Nagpur than Mumbai, Pune! AQI index shows, citizens should be careful
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात थंडी वाढताच हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी पहाटे ५ वाजता नागपूरच्या अनेक भागांत वायू गुणवत्ता निर्देशांक अर्थात एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) २५० च्या पुढे नोंदवला गेला, जो 'खराब' श्रेणीत मानला जातो आणि त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो. मुंबई, पुण्याच्या तुलनेत नागपुरात अधिक प्रदूषण असल्याचे 'एक्यूआय' मधून स्पष्ट होते.
शुक्रवारी सकाळच्या वेळी सिव्हिल लाइन्सची स्थिती सर्वात चिंताजनक होती, जिथे एक्यूआय २६१ पर्यंत पोहोचला होता. महाल भागात २५८ पातळीची नोंद झाली. रामनगरमध्ये २४७ आणि अंबाझरीमध्ये २१७ एक्यूआय नोंदवला गेला.
पहाटेच्या थंड आणि जड हवेत प्रदूषित कण खालीच साचून राहतात,ज्यामुळे हवा अधिक दूषित होते. प्राप्त माहितीनुसार, पुण्याचा सरासरी एक्यूआय हा १६० तर मुंबईचा एक्यूआय १८० पर्यंत नोंदविला जात असल्याने त्या पार्श्वभूमीवर नागपूरची हवा अधिक प्रदूषित आहे.
सकाळच्या वेळी प्रदूषणाची पातळी वेगाने वाढते
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकारी हेमा देशपांडे यांनी सांगितले की, हिवाळ्यात 'इन्व्हर्शन'ची स्थिती निर्माण होते. या काळात गरम हवा वर जाऊ शकत नाही आणि खाली असलेल्या थंड हवेत धुळीचे कण व इतर प्रदूषक अडकून राहतात. यामुळे सकाळच्या वेळी वायुप्रदूषणाची पातळी वेगाने वाढते.
धूर, धुके एकत्र येऊन 'स्मॉग'चे रूप
पर्यावरणतज्ज्ञ लीना बुद्धे म्हणाल्या की, थंडीसोबत वाहनांचा धूर आणि धुके एकत्र येऊन 'स्मॉग'चे रूप घेतात. यामुळे धुळीच्या कणांचे प्रमाण वाढते आणि एक्यूआय थेट वर चढतो. पहाटेची वेळ सर्वात धोकादायक असते, कारण हवेतील प्रदूषक सहजासहजी वर जात नाहीत. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी सकाळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, मास्कचा वापर करावा आणि संवेदनशील गट जसे की दमा रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांनी अतिरिक्त काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.