मेडिकल कर्मचारी २० पासून संपावर

By Admin | Updated: June 11, 2014 01:31 IST2014-06-11T01:31:46+5:302014-06-11T01:31:46+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या ४०० जागा रिक्त आहेत. मागील दहा वर्षांपासून या जागाच भरण्यात आल्या नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

Medical staff stamped from 20 | मेडिकल कर्मचारी २० पासून संपावर

मेडिकल कर्मचारी २० पासून संपावर

चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या ४०० जागा रिक्त
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या ४०० जागा रिक्त आहेत. मागील दहा वर्षांपासून या जागाच भरण्यात आल्या नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. रुग्णसेवाही प्रभावित झाली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी २० जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे कर्मचारी आपल्या मागण्यांना घेऊन १४ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार होते, तसे पत्रही अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना दिले होते. डॉ. पोवार यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात थेट वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याशी चर्चा घडवून आणली. डॉ. शिनगारे यांनी रिक्त पदे भरतीचे आश्वासन दिले. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु चार महिने उलटूनही काहीच झाले नसल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे.
मेडिकलमध्ये ८२० चतुर्थ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. ही पदे २५ वर्षांपूर्वीची आहेत. त्यावेळी मेडिकलमध्ये १४०० खाटा, २०-२५ वॉर्ड होते. रुग्णांची संख्याही कमी होती. आता यात वाढ झाली आहे. सध्याच्या स्थितीत मेडिकलमध्ये १५०० वर खाटा आहेत. ४६ वॉर्ड आहेत तर ३६ विविध विभाग आहेत. असे असताना मागील दहा वर्षात रिक्त होत गेलेल्या जागाच भरण्यात आलेल्या नाहीत. यातच अनुकंपातत्त्वावर १७ कर्मचाऱ्यांची भरतीही करून घेण्यात आली नाही. तब्बल ४०० पदे रिक्त आहेत. यातील २०-२५ कर्मचारी आजार आणि विविध कारणांमुळे गैरहजर असतात. परिणामी ३६० कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी आली आहे. यामुळे रुग्णालयात सफाई व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. रुग्ण सेवाही प्रभावीत झाली आहे. या सर्व समस्यांना घेऊन महाराष्ट्र जाती-जमाती कर्मचारी संघाचे शिष्टमंडळाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Medical staff stamped from 20