स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार- बावनकुळे
By कमलेश वानखेडे | Updated: May 24, 2025 19:32 IST2025-05-24T19:28:28+5:302025-05-24T19:32:52+5:30
निवडणुका लागल्यावर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार- बावनकुळे
कमलेश वानखेडे, नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाच्या नागपुरातील मेळाव्यात खा. प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकस्स्वबळावर लढण्याचा इशारा दिल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. पटेल, आत्राम काय बोलले हे मला माहिती नाही. पण भाजपची भूमिका आहे की आगामी निवडणुका महायुतीत लढायच्या. निवडणुका लागल्यावर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
नागपुरात शनिवारी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, महायुतीचे सर्वांनी इमानदारीने काम केले. २८८ आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचे रान केले. धर्मरावबाबा आत्राम यांना निवडून आणण्यासाठी मी दोन बैठका घेतल्या. यांनी काम केले नाही त्यांनी काम केले नाही, असे बोलण्याचे दिवस नाहीत. आता सरकारने लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. टीका टीप्पणीचे दिवस नाहीत, असा सल्ला देत बावकुळे यांनी धर्मरावबाबा आत्राम यांना दिला.
पाऊस नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश
मुख्यमंत्र्यांनी पावसाच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मी पण व्हीसीद्वारे सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. पंचनामे होऊन सर्वांना मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लाडक्या बहिणीबाबत कोण बातम्या पेरतात ?
लाडकी बहीण योजनेचे हेड वेगळे आहे. आदिवासी विभागाच्या निधीचे हेड वेगळे आहे. सामाजिक न्यायाचं वेगळ आहे. त्यामुळे मला हे समजत नाही की कोण या बातम्या पेरतात. संभ्रम निर्माण करतात. इकडचा निधी तिकडे करता येत नाही. त्यामुळे हा खोटारडेपणा आहे. काहीतरी बातम्या देऊन सरकारचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असेही बावनकुळे म्हणाले.