प्रकाशपर्व; एक दिवा मानवतेच्या अस्तित्त्वासाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 10:08 PM2020-04-05T22:08:33+5:302020-04-05T22:11:28+5:30

५ एप्रिलला रात्री नऊ वाजता प्रत्येकाने घरातील विद्युत दिवे बंद करून दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याच आवाहनाचा मान राखत नागपुरात घरोघरी दीप उजळण्यात आले.

A lamp for humanity's existence! | प्रकाशपर्व; एक दिवा मानवतेच्या अस्तित्त्वासाठी!

प्रकाशपर्व; एक दिवा मानवतेच्या अस्तित्त्वासाठी!

Next
ठळक मुद्देनऊ मिनिटांच्या दीपप्रज्वलनाने उजळल्या दाही दिशासर्वत्र झगमगाट, दिवाळीच झाली साजरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ही काही दिवाळी नव्हती की कोणता आनंद सोहळा! संकटाच्या काळात मन बधिर होते, काही केल्या मार्ग सापडेनासा होतो. सर्वत्र अंधार पसरला असतो. अशा स्थितीत तिमीराकडून उजेडाकडे जाणारा मार्ग प्रशस्त करणारा केवळ एक निमिष हवा असतो. अशाच संकटाचे सावट देशावरच नव्हे तर संपूर्ण जगावर पसरले आहे. संपूर्ण यंत्रणा अशा परिस्थितीशी दोन हात करत आहेत. अशावेळी सामान्यांचे मनोधैर्य खचू नये, त्यांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, अशी भावना जागृत करण्याचे कर्तव्य नेतृत्त्वाचे असते. तेच कौशल्य साधत देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण भारतवासीयांना मानवतेच्या शत्रुसंगे युद्ध पुकारण्यासाठी एकवटण्याचे आवाहन केले आणि त्याचा शंखनाद करण्यासाठी एक दिवा घरोघरी लावण्याचे आवाहन केले. या आवाहनाला नागपूरसह देशभरात उदंड प्रतिसाद प्राप्त झाला आणि मानवी अस्तित्त्वाच्या शत्रुसंगे युद्ध पुकारण्यासाठी ‘प्रकाशपर्व’ साजरा झाला.
५ एप्रिलला रात्री नऊ वाजता प्रत्येकाने घरातील विद्युत दिवे बंद करून दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याच आवाहनाचा मान राखत नागपुरात घरोघरी दीप उजळण्यात आले. दीप उजळण्यासह कुणी मोबाईल टॉर्च, टॉर्च, कुणी मशाली प्रज्वलित करत ‘आम्ही सर्व सोबत’ आहोत, याचे भान जागृत केले. यापूर्वीही २२ मार्च रोजी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार नागरिकांनी टाळी किंवा थाळी वाजवून कोरोना वॉरिअर्स अर्थात डॉक्टर, पोलीस, पत्रकार, स्वच्छता दूतांबाबत कृतज्ञता भाव व्यक्त केला होता. या घटनेकडे अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या असल्या तरी कृतज्ञतेचा हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ सगळ्यांनीच अनुभवला आणि आपोआपच निराशेच्या गर्तेत गेलेल्या प्रत्येकाचे हात उंचावले गेले होते. तशीच संमिश्र प्रतिक्रिया ‘प्रकाशपर्वा’बाबत निघत होत्या. मात्र, जेव्हा सगळा समाजमन एकवटतो तेव्हा सर्व नकार दूर पळून जातात आणि सुयोग्य प्रवाहासोबत आपणही चालावे, असा आत्मभानही जागृत होतो. तसे भान सर्वांनीच जपले. नऊ मिनिटांचा हा प्रकाशपर्व अनेकांच्या मनात दाटलेला अंधार दूर करणारा ठरला. घरोघरी दारावर दीप उजळले गेले. जणू दिवाळीच साजरी झाली. अनेकांनी घराच्या वरांड्यात, फ्लॅटमधील गॅलरीमध्ये, गच्चावर तर कुणी घरापुढे उभे राहून मोबाईलच्या टॉर्चने एकमेकांना प्रतिसाद दिला. काहींनी आपापल्या घरापुढे उभे राहून मशाली प्रज्वलित करत कोरोना संकटाशी सामना करण्यास सज्ज असल्याचा भाव जागृत केला. एकंदर हा प्रकाशपर्व मनामनात चेतना निर्माण करणारा ठरला.


कोणी गायले भजन, कोणी सादर केले वादन
: दीपप्रज्वलनाच्या वेळी कुणी भजन सादर केले तर कुणी तबला, गिटारचे वादन केले. काहींनी शंखनाद करत पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी २२ मार्च प्रमाणे जो घोळ निर्माण झाला होता तो टाळण्यात नागरिकांनी यश संपादन केले. आपापल्या घरूनच हा दिव्यांचा प्रकाशपर्व साजरा करण्यात आला. अनेक वस्त्यांमध्ये याची तयारी सकाळपासूनच करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्यांनी तशा सुचना दिल्या होत्या आणि लॉकडाऊन तुटणार नाही, याची काळजीही घेतली गेली होती.

दीपप्रज्वलनाचे महत्त्व
: भारतीय संस्कृती संध्याकाळच्या समयी देवघर, तुळशीवृंदावन व द्वारावर दिवे लावण्याची प्राचिन परंपरा आहे. त्यानुसार प्रत्येकच जण आपल्या धार्मिक परंपरेप्रमाणे दिवे उजळत असतोच. पणतीच्या प्रकाशाने मनातील मरगळ दूर होते आणि चेतना संचारते, असा विश्वास आहे. शिवाय, दिव्यांच्या उष्णतेने किटाणूंचा नाश होतो, असे शास्त्र सांगते. एका विशिष्ट वेळी सारा भारत एकच कृत्य करत असेल तर त्यात सलोखा, प्रेम आणि सजगतेचे भान प्रतिपातित होत असते. तेच भान जागविण्यासाठी एकसाथ संबंध भारताने साजरा केलेला हा प्रकाशपर्व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक इतिहास ठरला आहे.

Web Title: A lamp for humanity's existence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.