नायलॉन मांजा नको रे बाबा; पतंगाची दोर कापायची की आयुष्याची?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 06:00 PM2023-01-14T18:00:24+5:302023-01-14T18:04:11+5:30

नायलॉनने पतंग उडवाल तर अडचणीत याल : दोन दिवस उड्डाणपूल टाळाच

Injuries on the rise and kite flying nylon‘Manja’ Is to Blame | नायलॉन मांजा नको रे बाबा; पतंगाची दोर कापायची की आयुष्याची?

नायलॉन मांजा नको रे बाबा; पतंगाची दोर कापायची की आयुष्याची?

googlenewsNext

नागपूर : मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात; पण अनेक पतंग उडविणारे अनेक बेजबाबदार लोक बंदी असूनदेखील नायलॉनच्या मांजाचा उपयोग करतात. यातून कुणाच्याही आयुष्याची दोरी कापली जाण्याचा धोका असतो. हीच बाब लक्षात घेता पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री-खरेदी करणाऱ्यांविरोधात कारवाईचे प्रमाण वाढविले आहे. नायलॉन मांजाचा उपयोग करून कुणीही पतंग उडविली तरी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

नायलॉन मांजा एका खास प्रक्रियेने तयार करून मजबूत बनविला जातो. मात्र, हा मांजा दुचाकीस्वारांसाठी धोक्याचा ठरतो. अनेकजण दरवर्षी जखमी होतात, तर काही जणांच्या जिवावरदेखील बेतते. ही बाब लक्षात घेता पोलिसांकडून कारवाई वाढविण्यात आली आहे.

ऑनलाईन डिलिव्हरीवरदेखील ‘वॉच’

ई-कॉमर्स वेबसाइटवरून नायलॉन मांजाची विक्री करण्यात येते, तर काहीजण कुरिअरच्या माध्यमातूनदेखील मांजा मागवितात. पोलिसांची यावरदेखील नजर राहणार आहे.

पोलिस पथकांचा वॉच

नायलॉन मांजाचा वापर, विक्री यावर पोलिसांच्या पथकाची नजर आहे. मागील काही दिवसांत कारवाई वाढलेली आहे. पोलिसांकडे तक्रार आल्यावरदेखील लगेच कारवाई होत आहे.

पक्षी-प्राण्यांसह माणसाला धोका

नायलॉन मांजामुळे प्राणी-पक्ष्यांनादेखील धोका संभवतो. आतापर्यंत अनेक पक्षी जायबंदी झाले आहेत. याशिवाय लहान मुलांचेदेखील गळे कापले गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

मांजा ठरतो अपघाताचे कारण

दुचाकीस्वारांसाठी नायलॉन मांजा प्रचंड धोकादायक आहे. दुचाकीवरून जात असताना समोर मांजा आल्यावर गाडीचा तोल सावरत नाही. एकीकडे मांजामुळे होणारा आघात व दुसरीकडे वाहनाचा वेग यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. दरवर्षी असे अनेक अपघात होताना दिसून येतात. विशेषत: उड्डाणपुलावर वाहन चालविताना विशेष काळजी घ्यायची गरज असते.

नायलॉन मांजा टाळा, तक्रार करा

नायलॉन मांजा हा धोकादायक असतो. यासंदर्भात वारंवार आवाहन करण्यात येत आहे. जर कुणी नायलॉन मांजाचा वापर करीत असेल किंवा नायलॉन मांजाचा उपयोग करीत असेल तर थेट पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

ही घ्या काळजी

  • दुचाकी कमी वेगाने चालवा
  • गळ्याभोवती जाड रुमाल, स्कार्फ किंवा मफलर गुंडाळा
  • रुमाल, स्कार्फ नसेल तर शर्टच्या वरील बटन लावा
  • हेल्मेटची काच लावून दुचाकी चालवा
  • मांजा समोर आला तर हात समोर करून गळा वाचव
  • कुणी नायलॉन मांजा वापरत असेल तर लगेच पोलिसांना कळवा

Web Title: Injuries on the rise and kite flying nylon‘Manja’ Is to Blame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.