नागपुरमध्ये इंदूर टळले ! पाइपलाइनच्या दूषित पाण्यामुळे ८० नागरिकांची प्रकृती खालावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:48 IST2026-01-08T16:44:43+5:302026-01-08T16:48:13+5:30
Nagpur : तालुक्यातील खैरी सावनेर (ढालगाव) ला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन फुटली आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्या पाइपमध्ये दूषित पाणी शिरून नळाद्वारे प्रत्येक घरात पोहोचले.

Indore avoided in Nagpur! 80 citizens' health deteriorates due to contaminated water from pipeline
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/खापरखेडा : तालुक्यातील खैरी सावनेर (ढालगाव) ला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन फुटली आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्या पाइपमध्ये दूषित पाणी शिरून नळाद्वारे प्रत्येक घरात पोहोचले. दूषित पाणी प्यायल्याने या गावातील किमान ८० नागरिकांना पोटदुखी, हगवण व ओकाऱ्यांचा त्रास सुरू झाला. रुग्णांमध्ये लहान मुलांसह वयोवृद्धांचाही समावेश आहे. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
सुरुवातीला खैरी (ढालगाव) येथील १० ते १२ जणांना पोटदुखी, हगवण व ओकाऱ्यांचा त्रास जाणवायला सुरुवात झाली. त्या सर्वांनी खासगी डॉक्टरांकडून उपचार करवून घेतले. त्यानंतर याच प्रकारचा त्रास होणाऱ्या रुग्णांनी संख्या वाढत असल्याचे लक्षात येताच स्थानिक आशासेविकांनी या प्रकाराची माहिती खापा (ता. सावनेर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. आरोग्य यंत्रणेने तातडीने दखल घेत दोन दिवसांपूर्वी गावात कॅम्प सुरू करून रुग्णांवर तातडीने उपचार सुरू केले.
या कॅम्पमध्ये पहिल्या दिवशी ६५ तर दुसऱ्या दिवशी २५ रुग्णांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली. हा कॅम्प बुधवार (दि. ७) पासून बंद करण्यात आला. अनेकांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. काही स्थानिकांनी या प्रकाराचे फोटो व व्हिडीओ क्लिप लोकमतच्या खापरखेडा येथील प्रतिनिधीला पाठविल्याने हा प्रकार उघड झाला आहे. वृत्त लिहिस्तोवर जिल्हा परिषद अथवा आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी गावात पोहोचले नव्हते, अशी माहिती नागरिकांनी दिली.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
खैरी (ढालगाव) येथे फिल्टर प्लांट असून, तो चार वर्षापासून बंद आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन १५ दिवसांपूर्वी फुटली. या पाइपलाइपच्या दुरुस्तीकडे १४ दिवसांपासून दुर्लक्ष केले. पाण्याच्या टाक्यांची नियमित व व्यवस्थित साफसफाई केली जात नाही. शिवाय, पिण्याच्या पाण्याचे क्लोरिनेशनदेखील केले जात नाही, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची असून, ग्रामपंचायतीने या सर्व कामांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे, तर दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या समस्येमुळे गावाची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासन करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दवाखाना आपल्या दारी
तीन दिवसांपासून मळमळ व ओकाऱ्यांचा त्रास होत असून, प्रशासनाने मदत केली नाही, असे संगीता ताजने यांनी सांगितले. खासगी दवाखान्याचा खर्च परवडत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्या घरात तीन रुग्ण असून, शेजारीही रुग्ण आहेत. संपूर्ण गावात हा त्रास जाणवत असल्याची माहिती चैतराम पेठे यांनी दिली असून, सततच्या हगवणीमुळे आपण अशक्त झालो असल्याचे पांडुरंग चिपडे यांनी सांगितले. गेल्या पाच दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागाने 'दवाखाना आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक घरात जाऊन घरातील प्रत्येकाची युद्धपातळीवर आरोग्य तपासणी आणि रुग्णांना औषधांचे वाटप करणे सुरू केले आहे.
"पाइपलाइन फुटल्याने सांडपाणी त्यात शिरले आणि गावात या आजाराची लागण झाली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. नागरिकांनी किमान आठवडाभर पिण्याचे पाणी आधी चांगले उकळून ते थंड करावे व नंतर पिण्यासाठी वापरावे."
- मनोज हिरूडकर, खंडविकास अधिकारी, सावनेर.