नागपुरात कर्करोग रुग्णांमध्ये वाढ; ४० टक्के कर्करोग रुग्ण 'हेड अँड नेक'चे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 15:17 IST2025-07-26T15:15:50+5:302025-07-26T15:17:12+5:30
Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालयाची आकडेवारी

Increase in cancer patients in Nagpur; 40 percent of cancer patients are from 'Head and Neck'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कर्करोग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यातही मुख आणि मान (हेड अँड नेक) कर्करोगाच्या रुग्णांची संख्या ४० टक्के आहे. राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालयात २०२१ ते २०२३ या वर्षामध्ये एकूण ८ हजार ३२७ कर्करोग रुग्णांपैकी ३ हजार ३१६ रुग्णांना 'हेड अँड नेक कॅन्सर'चे होते. यात पुरुषांचे प्रमाण ७५ टक्के तर महिलांचे प्रमाण २५ टक्के होते.
२७ जुलै हा दिवस 'हेड अँड नेक कॅन्सर' दिवस म्हणून पाळला जातो. त्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलने ही आकडेवारी सादर केली. रुग्णालयाच्या रेडिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. करतार सिंग यांनी सांगितले की, हेड अँड नेक कॅन्सरमधील पुरुष आणि महिलांमध्ये सर्वात सामान्य मुख कर्करोग होता. इतरमध्ये घसा, स्वरयंत्र, मेंदू आणि मज्जासंस्था, थायरॉईड, आणि नाक, कान, घसा यांसारख्या अवयवांचा समावेश होता. कार्सिनोजेनिक जोखमीव्यतिरिक्त उशिरा निदान होणे समाजासाठी एक मोठा धोका आहे. संशोधन वैज्ञानिक डॉ. रेवू शिवकला यांनी या अभ्यासासाठी डेटा गोळा केला.
वेळीच निदान व उपचार आवश्यक
रुग्णालयाचे मानद सल्लागार डॉ. बी. के. शर्मा यांनी सांगितले, 'हेड अँड नेक कॅन्सर'ला दूर ठेवण्यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाला प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. वेळीच निदान व उपचारामुळे या रोगावरील उपचार यशस्वी होतात. सहसंचालक डॉ. हरीश केला यांनी सांगितले की, 'हेड अँड नेक कॅन्सर'च्या वाढत्या घटनांना सामुदायिक स्तरावर तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.
धक्कादायक आकडेवारी
- भारतात सुमारे ३० टक्के कर्करोगाची प्रकरणे 'हेड अँड नेक कॅन्सर'शी संबंधित आहेत. यापैकी सुमारे ७५ टक्के प्रकरणे थेट तंबाखू सेवनाशी संबंधित आहेत.
- तंबाखूसह इतर प्रमुख धोकादायक घटकांमध्ये दारूचे सेवन, सुपारी खाणे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा संसर्ग आणि एपस्टीन-बार व्हायरसचा संसर्ग यांचा समावेश आहे.
- सरासरी, प्रत्येक ३३ पैकी १ भारतीय पुरुष आणि प्रत्येक १०७ पैकी १ महिलेला त्यांच्या आयुष्यात मुख आणि मान कर्करोग होण्याची शक्यता असते.