प्रभारी कुलगुरूंचे 'मिशन क्लीन-लॅन्ड'

By Admin | Updated: May 9, 2014 02:21 IST2014-05-09T02:21:47+5:302014-05-09T02:21:47+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Incharge Chancellor's 'Mission Clean-Land' | प्रभारी कुलगुरूंचे 'मिशन क्लीन-लॅन्ड'

प्रभारी कुलगुरूंचे 'मिशन क्लीन-लॅन्ड'

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी विद्यापीठात तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांची विशेष बैठक बोलाविली होती. यावेळी संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी अतिक्रमण लवकरात लवकर कसे हटविता येईल याची चाचपणी केली. जेथे सुसज्ज अभ्यासालये उभी राहायला हवी होती, तेथे ढाबे दिमाखाने उभे आहेत. प्रभारी कुलगुरू हे विभागीय आयुक्त असल्यामुळे त्यांच्या 'मिशन क्लीन-लॅन्ड'मुळे विद्यापीठाला हक्काची जागा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
१९९१ साली क्रीडा संकुलासाठी विद्यापीठाची जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. परंतु नंतर कोराडी मार्गावर विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात आले. परंतु त्या काळात ७.४५ एकर जमिनीवर हॉटेल व ढाब्यांचे अनधिकृतपणे निर्माण करण्यात आले. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे.
ही जमीन अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कायदेशीररीत्या कोणते प्रयत्न केले जाऊ शकतात याचा आढावा गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अतिक्रमण झालेल्या जागेवरील वर्तमान स्थितीची माहिती त्यांनी घेतली. या जागेवर तब्बल १२ लोकांनी अतिक्रमण केले आहे अशी माहिती त्यांना देण्यात आली. या बैठकीला प्रभारी कुलगुरू अनुपकुमार, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, अप्पर जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. राहुल रेखावार आणि उत्पादन शुल्क अधीक्षक वरदे हे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Incharge Chancellor's 'Mission Clean-Land'