लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विनापरवाना आणि संशयास्पद बीटी कापूस बियाण्यांची अवैध वाहतूक व साठवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. धाडीदरम्यान २६ लाखांहून अधिक किमतीचे बियाणे जप्त केले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
१३ मे रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नागपुरातील ऑक्ट्रॉय फ्री झोन परिसरातील गोडाऊन क्रमांक २२/२ येथे छापा टाकण्यात आला. तेथे अशोक लेलँड कंपनीचा एमएच-४०-एके-३९९३ क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकमध्ये संशयास्पद बीटी कापूस बियाण्यांच्या ५८ प्लास्टिक बॅगा आढळून आल्या. त्यापैकी काही बॅगा गोडाऊनमध्ये उतरविण्याचे काम सुरू असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्या बॅगांमध्ये सुकून-१५ बीजी-२ हे कापूस बियाणे आढळून आले. बियाण्यांच्या प्रत्येक बॅगेत ४७५ ग्रॅम वजनाची ५० पाकिटे होती. एकूण २,९०७ पाकिटे जप्त करण्यात आली. ती बियाणे गुजरातमधील कंपन्यांनी उत्पादित व बाजारात आणल्याचे नमूद करण्यात आले होते.
कारवाईत जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची किंमत २६ लाख १९ हजार २०७ रुपये इतकी असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण ५१ लाख १९ हजार २०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात गुजरातमधील सुकून सीड्स प्रा.लि. या कंपनीचे नाव समोर आले आहे. तसेच डिलिव्हरी चलनावरून अमरावती येथील विक्रमभाई चौधरी उर्फ विक्रम जाट यांचेही नाव निष्पन्न झाले आहे. संबंधित कंपनीकडे महाराष्ट्रात बियाणे विक्रीचा वैध परवाना नसताना कापूस बियाण्यांची वाहतूक, साठवणूक आणि विक्री सुरू होती. तसेच बियाण्यांच्या लेबलिंगमध्येही अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. या बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांची दिशाभूल करून आर्थिक फायद्यासाठी फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू होता. कृषी अधिकारी रिना संदीप डोंगरे यांच्या तक्रारीनुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : Nagpur police uncovered an illegal seed racket, seizing ₹26 lakh worth of unlicensed BT cotton seeds. The seeds, originating from Gujarat, were stored in a godown. A case has been filed against the involved parties for alleged fraud and violation of seed regulations.
Web Summary : नागपुर पुलिस ने अवैध बीज रैकेट का भंडाफोड़ किया, ₹26 लाख मूल्य के बिना लाइसेंस वाले बीटी कपास बीज जब्त किए। गुजरात से उत्पन्न बीज एक गोदाम में संग्रहीत किए गए थे। धोखाधड़ी और बीज नियमों के उल्लंघन के आरोप में शामिल पक्षों के खिलाफ मामला दर्ज किया गया है।