मुंबईला लागून असलेल्या मुंब्रा परिसरात एका खळबळजनक हत्याकांडाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विवाहबाह्य संबंधातून एका महिलेने आपल्या पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकून देण्यात आला होता. मात्र, तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या जोरावर मुंब्रा पोलिसांनी या ब्लाईंड मर्डरचा अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंब्रा येथील रहिवासी असलेला अरबाज मकसूद अली खान हा दादरला कामावर जातो असे सांगून घरातून पडला, तो परतलाच नाही. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा पत्ता न लागल्याने अखेर वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवली.
मोबाईल लोकेशनने दिला सुगावा
तपासादरम्यान पोलिसांनी अरबाजच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासले. त्याचे शेवटचे लोकेशन वर्सोवा परिसरात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, त्याच वेळी त्याची प्रेमिका मेहजबीन शेख हिचे लोकेशनही त्याच परिसरात आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी मेहजबीनला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली. सुरुवातीला तिने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
असा रचला हत्येचा कट
मेहजबीनने आपला पती हसन आणि भाऊ तारिक शेख यांच्यासोबत मिळून अरबाजकडून खंडणी उकळण्याचा आणि त्याच्या हत्येचा कट रचला होता. पैसे देण्याच्या बहाण्याने त्यांनी अरबाजला वर्सोवा येथे बोलावून घेतले. मात्र, पैसे न मिळाल्याने संतापलेल्या आरोपींनी अरबाजचे हात बांधले आणि प्लास्टिकच्या पाईपने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला.
पुरावा नष्ट करण्यासाठी ड्रमचा वापर
हत्या केल्यानंतर या प्रकरणाचा कोणालाही सुगावा लागू नये यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूर मार्ग अवलंबला. त्यांनी अरबाजचा मृतदेह एका हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये कोंबला आणि तो ड्रम मुंब्रा येथील एका निर्जन नाले परिसरात फेकून दिला.
मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी महिला मेहजबीन शेख आणि तिचा भाऊ तारिक शेख यांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, महिलेचा पती हसन आणि त्याचा साथीदार मुजम्मल पठाण हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध हत्या, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : In Mumbra, a woman, aided by her husband and brother, murdered her lover after an affair. They disposed of the body in a drum in a drain. Police used mobile location to solve the case, arresting the woman and her brother. The husband remains at large.
Web Summary : मुंबई के मुंब्रा में एक महिला ने पति और भाई के साथ मिलकर अपने प्रेमी की हत्या कर दी। शव को ड्रम में भरकर नाले में फेंक दिया गया। पुलिस ने मोबाइल लोकेशन से मामले को सुलझाया, महिला और भाई गिरफ्तार, पति फरार है।