1 / 6Petrol-Diesel-CNG Price Hike: पश्चिम आशियातील संकटामुळे ज्याची भीती होती, तेच अखेर घडलं आहे. इंधन संकट गडद होत असतानाच शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या ४८ तासांत सर्वसामान्यांना महागाईचे एकामागून एक तीन मोठे झटके बसले आहेत. आधी दूध, मग मुंबईतील सीएनजी आणि आता पेट्रोल-डिझेल महागल्यानं सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे.2 / 6महागाईची सुरुवात दूध दरवाढीनं झाली. अमूल आणि मदर डेअरीसह अनेक मोठ्या ब्रँड्सनी दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. पशूखाद्य, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं कंपन्यांनी सांगितलं. दुधाचे दर वाढल्याने आता दही, तूप, मिठाई आणि चहा देखील महाग होण्याची शक्यता आहे.3 / 6दुधानंतर सीएनजीनं वाहनधारकांना झटका दिला. मुंबईत 'महानगर गॅस लिमिटेड'ने सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ करून तो ८४ रुपये प्रति किलो केला. त्यानंतर आता देशभर सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ झाली असून नवीन दर ७९.०९ रुपये झाला आहे. यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि खाजगी वाहनधारकांचा खर्च वाढला असून लवकरच स्थानिक वाहतुकीचं भाडेही वाढू शकतं.4 / 6तिसरा झटका म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ. यामुळे जनतेची चिंता आणखीच वाढली आहे. तेल कंपन्यांनी नवीन दर जाहीर केल्यानंतर, अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल अधिक महाग झालं आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम केवळ वाहनमालकांपुरताच मर्यादित नाही; उलट, त्याचा परिणाम सर्वच गोष्टींवर होतो. वाहतुकीचा खर्च वाढत असल्यानं, भाज्या, किराणा माल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ करम्यात आली आहे.5 / 6इराण आणि पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. 'होर्मुज'ची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून तेल कंपन्या तोट्यात चालल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यापूर्वीच इंधन बचतीचे आवाहन केलं होतं.6 / 6पश्चिम आशियातील तणाव अद्याप निवळलेला नाही, त्यामुळे आगामी काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत अजून वाढ होण्याची भीती आहे. डिझेल महागल्यामुळे ट्रक आणि बसची वाहतूक महाग होईल, ज्याचा थेट परिणाम भाजीपाला, फळे आणि धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊन महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता आहे.