पत्नीचे अनैतिक संबंध तुटावे म्हणून तिला गावी घेऊन गेला; तीन महिन्यांनी तो एकटाच परत आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:19 IST2025-11-22T16:18:10+5:302025-11-22T16:19:14+5:30
आरोपी पतीचा शोध सुरू : देवग्राम शिवारातील घटना

He took his wife to his village to end her immoral relationship; he returned alone after three months
लोकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : पत्नीचे प्रेमप्रकरण व अनैतिक संबंध माहिती झाल्याने पती तिला व मुलांना घेऊन त्याच्या मूळ गावी निघून गेला. तीन महिन्यांनी तो एकटाच परत आला. पत्नीचा प्रियकर दिसताच त्याने त्याची दगडाने ठेचून हत्या केली आणि पळून गेला. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवग्राम शिवारातील वर्धा नदीच्या तीरावरील शेतात गुरुवारी (दि. २०) सायंकाळी घडली असून, शुक्रवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. फरार आरोपी पतीचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणेदार तुषार चव्हाण यांनी दिली.
शरद उत्तमराव गवळी (३६, रा. देवग्राम, ता. नरखेड) असे मृत प्रियकराचे तर किशोर बालाजी सावलकर (४५, रा. दहीगोंडा, ता. धारणी, जिल्हा अमरावती) असे आरोपी पतीचे नाव आहे. किशोर त्याच्या पत्नीसोबत तीन वर्षांपूर्वी कामाच्या शोधात देवग्राम येथेआला होता. तो व त्याची पत्नी शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करायचे. शरद बकऱ्या चारण्याचे काम करायचा. मध्यंतरी त्याची व किशोरच्या पत्नीची ओळख झाली आणि त्या ओळखीचे रूपांतर त्यांच्या प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधात झाले. या प्रकाराची माहिती मिळाल्याने किशोर त्याची पत्नी व मुलांना घेऊन तीन महिन्यांपूर्वी त्याच्या मूळ गावी निघून गेला.
किशोर गुरुवारी जलालखेडा मार्गे देवग्रामला परत आला होता. सायंकाळच्या सुमारास त्याला शरद वर्धा नदीच्या तीरावर बकऱ्या चारत असल्याचे दिसले. शिवारात कुणीही नसल्याचे पाहून त्याने शरदला बेदम मारहाण करीत दगडाने ठेचून त्याची हत्या केली आणि पळून गेला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तपास ठाणेदार तुषार चव्हाण करीत आहेत.
प्रेयसी भेटायला आली?
आरोपी किशोरची पत्नी अर्थात शरदची प्रेयसी त्याला भेटण्यासाठी गुरुवारी देवग्राम येथे आली असावी. ते दोघेही नदीकाठच्या शेतात भेटले असावे. तिचा पाठलाग करीत किशोर देवग्राम शिवारात आला असावा. हत्या करण्याची पद्धती पाहता किशोरसोबत त्याचा एखादा साथीदार असावा, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली असून, त्याला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. पोलिस किशोरचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत.
बकऱ्या परत आल्या, पण...
गुरुवारी सायंकाळी संपूर्ण बकऱ्या घरी परत आल्या. मात्र, शरद रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा गावाच्या परिसरात शोध घ्यायला सुरुवात केली. शुक्रवारी पहाटे त्याचा मृतदेह नदीकाठच्या शेतातील तुरीच्या पिकात आढळून आला. त्याचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला होता तर शरीर रक्ताने माखले होते. त्याची हत्या केल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले होते.