अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेला; पोलिसांनी पकडल्यावर त्याने लॉकअपमध्येच जीव दिला, आई - वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:30 IST2026-01-23T16:29:52+5:302026-01-23T16:30:57+5:30

Nagpur : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीने जरीपटका पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

He kidnapped a minor girl; after being caught by the police, he committed suicide in the lockup, parents make serious allegations against the police | अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेला; पोलिसांनी पकडल्यावर त्याने लॉकअपमध्येच जीव दिला, आई - वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप

He kidnapped a minor girl; after being caught by the police, he committed suicide in the lockup, parents make serious allegations against the police

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीने जरीपटका पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

नागेंद्रकुमार रामजी भारतीया (२०, मदारीपूर, प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे मृत आरोपीचे नाव आहे. तो विज्ञान शाखेचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीशी संपर्क केला व तिच्याशी बोलू लागला. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला लग्न करू, अशी गळ घातली. तो डिसेंबर महिन्यात नागपुरातदेखील आला होता. त्याने तिला पळून जाण्यासाठी जिद्द केली व
आठवड्याभराअगोदर नागपुरात येऊन त्याने तिला घेऊन पळ काढला. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी सगळीकडे शोधाशोध केली; मात्र ती कुठेच न सापडल्याने जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोधमोहीम राबविली. तपासादरम्यान मुलगी प्रयागराजला असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने नागेंद्रला अटक केली व मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या हवाली केले. त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले व दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

थंडीचा कालावधी असल्याने त्याला अंगावर ओढायला चादर दिली होती. पहाटेच्या सुमारास फारसा बंदोबस्त नसताना नागेंद्र उठला व त्याने चादर फाडली. शौचालयातून लपवून डबा आणला व त्यावर चढून चादर लॉकअपच्या रॉडला बांधली. त्यानंतर त्याने गळफास घेतला. काही वेळाने पोलिस कर्मचारी तेथे पोहोचला असता त्याला नागेंद्र गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने याची माहिती देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पोलिस वर्तुळात पसरली. जरीपटका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष न ठेवल्याने हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मृताच्या आईला चक्कर, वडिलांचे पोलिसांवर आरोप

दरम्यान, मृत नागेंद्रचे आईवडीलदेखील नागपुरात पोहोचले. मुलाच्या आत्महत्येची माहिती कळताच त्याच्या आईने ठाण्यासमोरच आक्रोश केला व तिला चक्कर आली. तर पोलिसांनी आम्हाला मुलाच्या मृत्यूची कुठलीही माहिती दिली नाही. मुलीच्या नातेवाइकांनी प्रकरणात तडजोड करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तेच पैसे घेऊन आम्ही नागपूरला आलो होतो. लॉकअपमध्ये मुलाने जीव दिल्याने ही पूर्णतः पोलिसांचीच जबाबदारी आहे, असा आरोप त्याचे वडील रामजी यांनी केला.

एकाही कर्मचाऱ्याचे लक्ष कसे नाही?

आरोपीचे वय कमी असले तरी त्याने केलेल्या प्रकारामुळे पोक्सो व अपहरणाचा गुन्हा त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला होता. त्यामुळे तो हादरला होता. लॉकअपमध्ये आरोपींवर लक्ष ठेवणे ही सर्वस्वी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. मात्र, नागेंद्रने चादर फाडली, शौचालयातून डबा आणला व तरीदेखील एकाही कर्मचाऱ्याचे याकडे लक्ष गेले नाही, ही बाब अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. या प्रकरणात आता सीआयडीकडून तपास करण्यात येत आहे. सीआयडीच्या पथकाने ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज, स्टेशन डायरी व इतर तपशील ताब्यात घेतले आहेत.

ठाण्याचे दरवाजे केले बंद

लॉकअपमध्ये कैद्यांवर लक्ष देण्याची जबाबदारी राहुल चव्हाण, प्रमोद दुधकावरे, अभय काकोडे यांच्यावर होती. तर नितीन आत्राम हे ड्यूटी अधिकारी होते. त्यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, सीआयडीचे पथक घटनास्थळी येईपर्यंत जरीपटका पोलिस ठाण्यातील प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्यामुळे नागेंद्रच्या पालकांनादेखील बराच वेळ आत जाता आले नाही.


 

Web Title: He kidnapped a minor girl; after being caught by the police, he committed suicide in the lockup, parents make serious allegations against the police