सोने होणार ३० हजारी !

By Admin | Updated: April 21, 2016 03:08 IST2016-04-21T03:08:08+5:302016-04-21T03:08:08+5:30

सोनं ते सोनंच! सर्वाधिक परतावा देणारी मौल्यवान धातू सोन्याला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर मागणी वाढत आहे.

Gold will fall 30! | सोने होणार ३० हजारी !

सोने होणार ३० हजारी !

आणखी झळाळी येणार : रुपयातील चढ-उतार कारणीभूत
मोरेश्वर मानापुरे नागपूर
सोनं ते सोनंच! सर्वाधिक परतावा देणारी मौल्यवान धातू सोन्याला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर मागणी वाढत आहे. भारतात लग्नसराईमुळे सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. स्थानिक बाजारात गेल्या दोन वर्षांत पुन्हा एकदा बुधवार, २० एप्रिलला सोन्याने २९,८७५ रुपयांचा पल्ला गाठला आहे. साठेबाज आणि लग्नसराईत किरकोळ ग्राहकांची खरेदी वाढल्याने स्थानिक बाजारात काहीच दिवसांपूर्वी २९ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या किमतीत मिळणाऱ्या सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा उसळी मारत ३० हजाराकडे झेप घेतली. २९,८७५ रुपये असलेले भाव शनिवारपर्यंत ३० हजारांचा पल्ला गाठणार असल्याची माहिती सराफांनी दिली.

दहा महिन्यांत पाच हजारांची वाढ
दहा महिन्यांपूर्वी सोने २५ हजारांच्या आत येईल, अशा बातम्या देशभरात झळकल्या होत्या. त्यावेळी ग्राहकांनी सोन्याची सर्वाधिक खरेदी केली होती. अनेकांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केले. त्यावेळी सोने २५,१०० रुपयांवर स्थिरावले होते. त्यानंतर दरवाढ झाली.

रुपयाचे मूल्य ठरवणार किंमत?
रुपया मजबूत झाल्यास सोन्याचा भाव घसरू शकतो, तसेच रुपयाचे मूल्य घसरल्यास सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. सोन्याची किंमत कमी होण्याची ग्राहकांना प्रतीक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली आहे. ३० हजारांकडे वाटचाल सुरू आहे. रुपयाच्या चढउतारामुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे.

सीमाशुल्क कमी होणार
सोने आयातीवर केंद्र सरकारने १० टक्के सीमाशुल्क लावले आहे. याशिवाय निर्यातीवर एक टक्का आणि एक टक्का अबकारी कर आकारण्यात येतो. सराफांच्या ४० दिवसांच्या संपानंतर सरकारने नमते घेतले आहे. सीमाशुल्कात ५ टक्के कपात आणि निर्यातीवरील कर रद्द करण्याची सरकारची तयारी असून यासंदर्भातील अध्यादेश केव्हाही निघू शकतो.

Web Title: Gold will fall 30!