जेथे सुरू होते दुरूस्तीचे काम, तेथेच कोळशाने भरलेली मालगाडी घसरली, कळमना यार्डात दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 08:08 PM2023-01-12T20:08:41+5:302023-01-12T20:11:06+5:30

छत्तीसगडमधून कोराडी ऊर्जा प्रकल्पासाठी ५८ डब्यांची मालगाडी कोळसा घेऊन आली.

Freight train derailed in Kalmana yard in nagpur | जेथे सुरू होते दुरूस्तीचे काम, तेथेच कोळशाने भरलेली मालगाडी घसरली, कळमना यार्डात दुर्घटना

जेथे सुरू होते दुरूस्तीचे काम, तेथेच कोळशाने भरलेली मालगाडी घसरली, कळमना यार्डात दुर्घटना

Next

नरेश डोंगरे

नागपूर -  कोळशाने भरलेली मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली. कळमना यार्डजवळ गुरुवारी दुपारी १.१५ वाजता ही दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेमुळे कुणालाही दुखापत झाली नाही किंवा रेल्वे वाहतुकीवरही त्याचा विपरित परिणाम झाला नाही. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ट्रॅक मेंटेनन्सचे काम सुरू होते, त्याच ठिकाणी ही दुर्घटना घडली.

गुरुवारी दुपारी छत्तीसगडमधून कोराडी ऊर्जा प्रकल्पासाठी ५८ डब्यांची मालगाडी कोळसा घेऊन आली. नागपुरातील कळमना मार्गे कोराडीकडे ही मालगाडी दुपारी १.१५ च्या सुमारास निघाली. काही अंतरावर इंजिनिअरिंग विभागातर्फे ट्रॅक मेंटेनन्सचे काम सुरू होते. त्याच भागात आलेल्या रेल्वेगाडीचे ३४, ३५, ३६ आणि ३७ क्रमांकाचे चार डबे रुळावरून खाली घसरले. त्यामुळे मालगाडीला मोठा धक्का बसला. गाडीचा वेग कमी असल्यामुळे चालकाला गाडी थांबविणे सहज शक्य झाले. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती रेल्वे कंट्रोल रूममधून सर्वत्र देण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मदतकार्य करणारी रेल्वेगाडी तातडीने घटनास्थळी रवाना केली. मंडळ रेल्वे व्यवस्थापक मनिंदरसिंग उप्पल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धावले. त्यांनी आवश्यक ती मदत यंत्रणा बोलवून रुळावरून घसरलेले डबे मालगाडीपासून दूर केले. त्यानंतर त्या डब्यांमधील कोळसा खाली करून तो दुसऱ्या डब्यात भरण्यात आला. त्यानंतर मालगाडी दुसऱ्या लाईनवर टाकण्यात आली.

कळमना यार्डमध्ये ही घटना घडल्यामुळे मेन लाईनवर चालणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली. वृत्तलिहिस्तोवर मदत कार्य सुरू होते.

लाईन ब्लॉक का केली नाही?

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. त्या ठिकाणी १५ केपीएचचा सावधानतेचा ईशारा आहे. तेथे ट्रॅक मेंटेनन्सचे काम केले जात असताना ही लाईन ब्लॉक का करण्यात आली नाही, ते कळायला मार्ग नाही. दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, त्याची चौकशी केली जात असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
 

Web Title: Freight train derailed in Kalmana yard in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर