दगडफेक प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्टने होईल पोलिसांची पोलखोल ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:28 IST2025-10-03T19:28:02+5:302025-10-03T19:28:32+5:30
Nagpur : घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून माध्यमांना माहिती दिली. मात्र, त्यांच्या हातात एक्सपर्टचा रिपोर्ट नव्हता देशमुखांचा आरोप

Forensic report will expose police in stone-pelting case! Former Home Minister Anil Deshmukh's allegations
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ११ महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या काळात माझ्या गाडीवर झालेल्या दगड हल्ल्याला सुरुवातीपासूनच राजकीय वळण देण्याचा प्रयत्न झाला. हल्ल्यानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ही सलीम-जावेदची स्टोरी आहे' असे वक्तव्य केले. त्याचबरोबर नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी चौकशी पूर्ण होण्यापूर्वी आणि फॉरेन्सिक एक्सपर्टचा अहवाल येण्यापूर्वीच ही घटना खोटी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
देशमुख म्हणाले, निवडणुकीच्या काळात माझ्यावर व माझ्या गाडीवर दगडफेक झाली होती. गाडीच्या काचेला दगड लागून ती फुटली आणि माझ्या कपाळावर जखम झाली. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटले आहे की दोन व्यक्तींनी माझ्या गाडीवर दगड मारले. एकाने समोरील काचेला तर दुसऱ्याने मी बसलो होतो त्या मागच्या काचेला दगड मारला, ज्यामुळे काच फुटून माझ्या कपाळाला जखम झाली.
हा निवडणुकीतील स्टंट : बावनकुळे
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित घटना ही निवडणुकी दरम्यान सहानुभूती मिळवण्याचा प्रकार होता. हे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. दहा किलोचा दगड खरोखर लागला असता तर वेगळीच परिस्थिती उद्भवली असती. हा प्रकार एक केविलवाणा स्टंट होता. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल, असे मत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
कायदेशीर लढाईची तयारी
आता ११ महिन्यांनी जेव्हा अधिकृत फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे, त्यामध्ये दोन व्यक्तींनी दगडफेक केल्याचे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी केलेले विधान राजकीय दबावातून होते हे उघड झाले आहे. याविरोधात कायदेशीर लढा लढणार आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
पोलिसांवर गंभीर आरोप
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून माध्यमांना माहिती दिली. मात्र, त्यांच्या हातात एक्सपर्टचा रिपोर्ट नव्हता. दुसऱ्या दिवशी मतदान असल्याने राजकीय दबावाखाली घाईघाईने हा कार्यक्रम घेण्यात आला. यामुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम व्हावा, हा प्रयत्न होता, असा आरोप देशमुखांनी केला.