"शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही!" चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 20:49 IST2025-10-12T20:46:36+5:302025-10-12T20:49:47+5:30
Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही यादृष्टीनेच पावले उचलण्यात येत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

"शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही!" चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन
नागपूर: अतिवृष्टीचा फटका झेलणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येत आहे. सरकारने अगोदरच ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही यादृष्टीनेच पावले उचलण्यात येत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. रविवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्याला व्हिजन २०३५ आणि २०४७ ची दिशा देणारे हे सरकार केवळ घोषणांवर नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवते. शेतकरी संकटात असताना सरकारने चर्चांपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. राजकारणात नेतृत्व हे केवळ पदावरून नव्हे, तर कृतीतून सिद्ध होते. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिदृश्यात ही रेषा अधिक स्पष्ट दिसत आहे, असे बावनकुळे म्हणाले.
सोमवारी नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर-अमरावती विभागीय बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकरी पॅकेजचा अंमल, महसूल–कृषी यंत्रणेचे समन्वय आणि आगामी निवडणुकांची तयारी यावर चर्चा होणार होईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.यावेळी त्यांनी परत एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे हतबल मुख्यमंत्री होते, तर देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेतृत्व देणारे नेते आहेत. फडणवीस हे प्रशासन आणि जनसंपर्क या दोन्ही आघाड्यांवर सक्रिय असतात, तर ठाकरे यांनी शासनकाळ काचेच्या घरात घालविल्याचा आरोप त्यांनी केला.
उद्धव–राज ठाकरे यांची भेट ही कौटुंबिक बाब
उद्धव–राज ठाकरे यांची भेट ही त्यांची कौटुंबिक बाब आहे, दीपावली सारख्या पर्वावर परिवार एकत्र येणे योग्यच आहे. त्यात आम्ही राजकारण पाहत नाही असे त्यांनी सांगितले.