सैन्यासाठी स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत स्फोट; ‘सोलर इंडस्ट्रीज’मध्ये ९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 06:30 AM2023-12-18T06:30:37+5:302023-12-18T06:30:54+5:30

उपकरणे तयार करणाऱ्या नागपूरच्या ‘सोलर इंडस्ट्रीज’मधील घटना

Explosions in the manufacture of explosives for the military; 9 people died in 'Solar Industries' | सैन्यासाठी स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत स्फोट; ‘सोलर इंडस्ट्रीज’मध्ये ९ जणांचा मृत्यू

सैन्यासाठी स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत स्फोट; ‘सोलर इंडस्ट्रीज’मध्ये ९ जणांचा मृत्यू

जितेंद्र ढवळे/योगेश पांडे/ब्रिजेश तिवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरजवळील चाकडोह येथील भारतीय सैन्यदलासह विविध कामांसाठी स्फोटके आणि अन्य उपकरणे तयार करणाऱ्या ‘सोलर इंडस्ट्रीज’मध्ये रविवारी सकाळी झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा मृत्यू झाला, तर तीन कामगार जखमी झाले. घटनेबाबत कळताच कामगारांच्या नातेवाइकांसह स्थानिकांनी कंपनीकडे धाव घेत आक्रोश केला. खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.   

कोळसाखाणीसाठी लागणारी स्फोटके बनविण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. त्यामुळे युनिटची इमारत उद्ध्वस्थ झाली. मलब्याखाली जिवंत स्फोटकेदेखील दबल्या गेल्याने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नव्हते. 

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत : मुख्यमंत्री
सोलर इंडस्ट्रीजमध्ये स्फोटाच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कंपनीनेदेखील २० लाख रुपये मदत जाहीर केली आहे.  

उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांनीही दिली भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सोलर इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.

संरक्षण मंत्रालयाकडून दखल
सोलर इंडस्ट्रीजमध्ये सैन्य दलासाठी मल्टिमोडल ग्रेनेड्स तयार केले जात असल्याने या स्फोटाची संरक्षण मंत्रालयानेदेखील दखल घेतली आहे.  हा स्फोट अपघातामुळे झाला आहे की, यामागे घातपात आहे याचा सखोल तपास करण्यात येणार आहे. घटनेची ‘एटीएस’, फॉरेन्सिक  तपास यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
सोलर इंडस्ट्रीजच्या माध्यमातून भारतीय लष्करासाठी लागणारा विविध दारूगोळा, शस्त्रे तयार करण्यात येतात. तसेच ड्रोन्स, इंडस्ट्रीअल स्फोटके, इलेक्ट्रिकल डेटोनेटर्सही उत्पादित केले जातात. त्यामुळे नियमित सुरक्षाविषयक ऑडिट करण्यात येते. तरीही  स्फोट झाल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. 

संपूर्ण परिसर केला ‘सील’
स्फोटानंतर संपूर्ण परिसर ‘सील’ करण्यात आले. स्फोटाचे हादरे इतर युनिट्सलादेखील बसले. इतर युनिटमधील कामगारांनाही बाहेर काढले आहे. घटनेची चौकशी सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार 
यांनी सांगितले.

युनिटमध्ये नेमके घडले तरी काय?
युनिटमध्ये कोळसा खाणींसाठी लागणाऱ्या ‘बूस्टर्स’चे उत्पादन सुरू होते. कुठलीही स्फोटके तयार करताना कच्च्या मालाची चाळणी होते व त्याचे ‘सिव्हिंग’ करण्यात येते. तेच काम सुरू असताना स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Explosions in the manufacture of explosives for the military; 9 people died in 'Solar Industries'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.