नाना पटोले, संजय धोत्रे वगळता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:05+5:302021-01-19T04:11:05+5:30

- अनिल देशमुख, सुनील केदार, संजय राठोड, यशोमती ठाकूर या मंत्र्यांचा दबदबा कायम - संजय धाेत्रेंच्या गावात वंचितची मुसंडी ...

Except Nana Patole and Sanjay Dhotre | नाना पटोले, संजय धोत्रे वगळता

नाना पटोले, संजय धोत्रे वगळता

Next

- अनिल देशमुख, सुनील केदार, संजय राठोड, यशोमती ठाकूर या मंत्र्यांचा दबदबा कायम

- संजय धाेत्रेंच्या गावात वंचितची मुसंडी

- खा. प्रतापराव जाधव, राजेंद्र शिंगणे, चंद्रशेखर बावनकुळे, अमित झनक यांनी गाव राखले

- मिटकरींची जादू चालली, अकाेल्यात जि. प. अध्यक्षांचा गावातच धुव्वा

नागपूर : विदर्भातील गडचिरोली जिल्हा वगळता उर्वरित दहाही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत महाविकास आघाडीने बाजी मारली असून, भंडारा, गोंदियात समतुल्य लढत झाली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघात भाजपने मुसंडी मारली. अनिल देशमुख, सुनील केदार, संजय राठोड, यशोमती ठाकूर या मंत्र्यांचा त्यांच्या मतदारसंघात दबदबा कायम राहिला. खा. प्रतापराव जाधव, राजेंद्र शिंगणे, माजी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अमित झनक यांना आपले गाव कायम राखण्यात यश आले.

नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडी अव्वल ठरली. काटोल मतदारसंघात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबदबा कायम राहिला. काटोल तालुक्यातील ३ पैकी एका ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी (राष्ट्रवादीला) ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. येथे दोन ग्रा.पं.वर महाविकास आघाडी आणि भाजपने दावा केला आहे. नरखेड तालुक्यातील १७ पैकी १५ ग्रा.पं.वर महाविकास आघाडी (राष्ट्रवादी), तर दोन ग्रा.पं. मध्ये भाजप समर्थित पॅनेलला यश मिळाले आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सावनेर मतदारसंघात एकतर्फी बाजी मारली. त्यांच्या पाटणसावंगी या गावातही त्यांनी विजयी झेंडा रोवला. सावनेर तालुक्यात १२ पैकी ११ व कळमेश्वर तालुक्यात ५ पैकी ४ ग्रा.पं.मध्ये काँग्रेसने बाजी मारली. सोनपूर (आदासा) व जटामखोरा या दोन ग्रामपंचायती आधीच अविरोध झाल्या होत्या. कामठी तालुक्यातील कोराडी ग्रा. पं. राखण्यात माजी मंत्री व भाजपचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले. येथे भाजप समर्थित आदर्श ग्राम निर्माण आघाडी १७ पैकी १२ जागांवर विजयी झाली. महालगावमध्ये जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल निधान यांना काँग्रेसने धक्का दिला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नियोजनाला यश आले.

वर्धा जिल्ह्यात ५० ग्रामपंचायतींचे निकाल लागले. यात भाजपला १६, काँग्रेसला १२, राकाँला नऊ, महाविकास आघाडीला पाच, स्वतंत्र भारत पक्षाला एक, तर स्थानिक आघाड्यांना सात ग्रामपंचायतींवर यश मिळाल्याचे चित्र आहे. शिवसेनेने आपले ८१ उमेदवार विजयी झाल्याचा दावा केला आहे. आर्वी तालुक्यात काँग्रेसला सर्वाधिक यश मिळाले असून, सेलू तालुक्यात भाजपने चांगले यश मिळविले आहे.

भंडारा जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप समतूल्य असल्याचे दिसत असून, जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींपैकी ७४ ग्रामपंचायतींवर आघाडीने, तर ७१ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. तीन ग्रामपंचायतींत स्थानिक आघाडीने विजय संपादन केला. गोंदिया जिल्ह्यातील एकूण १८१ जागांपैकी ८१ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी, तर ६९ ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला आहे. गोंदिया तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींपैकी १५ भाजप, ७ काँग्रेस-राकाँने आणि अपक्षांनी १५ जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांना १४ ग्रामपंचायतींवर, तर माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी १५ ग्रामपंचायतींवर आपले उमेदवार निवडून आल्याचा दावा केला.

अमरावती जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींपैकी १६ अविरोध घोषित करण्यात आल्यावर उर्वरित ५३७ ग्रामपंचायतींसाठी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसने ३४१ ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेही चमकदार कामगिरी केली. महिला व बाल कल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे मूळ गाव असलेल्या मोझरी येथे त्यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास पॅनेलने १३ पैकी ७ जागा जिंकल्या. कम्युनिस्ट पक्षाच्या जनशक्ती पॅनेलला दोन जागा, तर चार जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. येथे ९८० पैकी ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. पालकमंत्री संजय राठोड यांना आपल्या दिग्रस मतदारसंघातील तीनही तालुक्यांत सेनेचे वर्चस्व राखण्यात यश आले. माजी खासदार विजय दर्डा यांनी दत्तक घेतलेल्या यवतमाळ तालुक्यातील भारी गावात काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या पॅनेलने बाजी मारली. जि.प.चे उपाध्यक्ष क्रांती कामारकर यांच्या पुसद तालुक्यातील आसोला गावात त्यांच्या पॅनेलला केवळ एक जागा मिळाली.

अकाेल्यातील आमदारांनी आपल्या गावात आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे समाेर आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे व अकाेला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या पळसाे बढे या गावात वंचित बहुजन आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाले, तर भाजपचे चार उमेदवार जिंकले. बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या सस्ती या गावात त्यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. अकाेट तालुक्यातील कुटासा ग्रामपंचायतीमध्ये अमाेल मिटकरी हे आमदार झाल्यानंतरच्या निवडणुकीचे नेतृत्व केले. त्यामध्ये त्यांना घवघवीत यश मिळाले. अकाेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा भाेजने यांच्या भांबेरी या गावात त्यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला असून, केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

खासदार प्रतापराव जाधव यांच्या मादणी गावात शिवसेना पुरस्कृत पॅनेलला ११ पैकी सात जागा मिळाल्या आहेत. तसेच पालकमंत्री ना. डाॅ. राजेंद्र शिंगणे यांच्या पॅनेलने शेंदुर्जन गावात एकहाती सत्ता मिळवली आहे. वाशिम जिल्ह्यात काँग्रेसचे आ. अमित झनक यांनी मांगूळझनक गावची सत्ता कायम राखली, तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक यांनी चिखली ग्रामपंचायतीची सत्ता गमावली.

............................................

नाना पटोलेंच्या मतदारसंघात भाजपची मुसंडी

- साकोली हा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा गृह तालुका आहे. या निवडणुकीत साकोली तालुक्यात भाजपने मोठी मुसंडी मारली असून, १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापित केले. लाखनी तालुक्यातही १५ ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या, तर भंडारा तालुक्यात २२ ग्रामपंचायतींत भाजप आघाडीवर आहे.

———————————

दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या गावात भाजप

- पुसदमधील गहुली हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांचे गाव आहे. या गावात भाजपचे विधान परिषद सदस्य ॲड. नीलय नाईक यांचे बंधू अनिल नाईक यांच्या पॅनेलने विजय मिळविला.

............................................

Web Title: Except Nana Patole and Sanjay Dhotre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.