शिंदे-पवार ‘एक म्यान में दो तलवार’, सरकार पुन्हा अस्थीर होणार; विजय वडेट्टीवार यांचे भाकित
By कमलेश वानखेडे | Updated: July 3, 2023 14:06 IST2023-07-03T14:04:12+5:302023-07-03T14:06:04+5:30
शिंदे यांचे हे शेवटचे अधिवेशन

शिंदे-पवार ‘एक म्यान में दो तलवार’, सरकार पुन्हा अस्थीर होणार; विजय वडेट्टीवार यांचे भाकित
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हात मिळणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होणे ही एक अनैसर्गिक तडजोड आहे. शिंदे व पवार हे दोन्ही नेते आपले लक्ष्य साधताना कुणाचाही पर्वा करणारे नाहीत. हे सरकार आधीच अस्थीर होते. आता ‘एक म्यान मे दो तलवार’ अशी परिस्थीत झाल्यामुळे म्यानच फुटण्याची वेळ येईल व सरकार पुन्हा अस्थीर होईल, असे मत काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
कालची फूट ही अनपेक्षित होती, असं म्हणणं चुकीच आहे. ते अपेक्षीतच होतं. शरद पवारांचे प्रयत्न सुरू होते, अजित पवारांना समजवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांना थांबायचं नव्हतं. अजित पवारांना जाण्याचं काही एक कारण नव्हतं. गेली अनेक वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते राहू शकत नाही. सत्ता गेली त्या दिवसापासून धुसफुस वाढली होती. अजित पवार यांचा कल सत्तेकडे होता, हे शरद पवार यांच्याही लक्षात आले होते. शरद पवारांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण ते मानले नाहीत. ९० टक्के लोकांनी या घाणेरड्या राजकारणावर चीड व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरून सामान्य जनतेने चीड व्यक्त केली. आता जनताच यांना धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीत फूट, काँग्रेसनं केला विरोधी पक्षनेतेपदावर दावा, बाळासाहेब थोरात म्हणाले…
विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेवर वेळेत निर्णय घ्यावा, यासाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवल्यानंतर काय, याची तजवीज भाजपने करून ठेवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून आगामी अधिवेशन हे अखेरचे अधिवेशन ठरेल, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. वापरा व फेका हे भाजपचे धोरण आहे. त्याचा अनुभव शिंदे गटालाही लवकरच येईल, असा चिमटाही त्यांनी काढला.
अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना ५ जुलैपर्यंत अल्टीमेटम? आव्हाडांनी शरद पवारांशी 'वैर' स्पष्ट केले
ज्याची संख्या जास्त त्याचा विरोधी पक्षनेता
काँग्रेसची मंगळवारी मुंबईत बैठक आहे. संख्याबळावर विरोधी पक्षनेता ठरतो. राष्ट्रवादीकडे किती आमदार आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. लहान भाऊ, मोठा भाऊ हा आताचा विषय नाही. सर्व नेत्यांच्या समन्वयातून मार्ग निघेल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.