Eight-year-old girl raped by neighbor in Nagpur | नागपुरात आठ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याचा बलात्कार
नागपुरात आठ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याचा बलात्कार

ठळक मुद्देसंतप्त जमावाकडून आरोपीची धुलाई : धंतोली पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:च्या मुलासोबत खेळणाऱ्या तिसऱ्या वर्गातील मुलीला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाचे पाप उघड झाल्यानंतर संतप्त जमावाने त्याची बेदम धुलाई केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
कमलेश मोतीराम तुमडाम (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तो धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. त्याला सात वर्षांचा मुलगा आहे. त्या मुलासोबत बाजूलाच राहणारी पीडित मुलगी (वय ८ वर्षे) खेळते. ती तिसऱ्या वर्गात शिकते. आरोपीच्या मुलासोबत नेहमीच राहत असल्याने तिचे आरोपी कमलेश तुमडामच्या घरीही जाणे-येणे आहे. बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास ती तिच्या आईसोबत घरी असताना कमलेश आला. माझा मुलगा कुठे आहे, असे त्याने पीडित मुलीला विचारले. तिने माहीत नाही म्हटले असता त्याने चल त्याला शोधू म्हणून घरून सोबत नेले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी मुलगी घरी परत आली नाही म्हणून मुलीच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने आरोपीचे घर गाठले. पहिल्या माळ्यावरील खोलीत आरोपी कमलेश पीडित मुलीचे कपडे काढून नको ते कृत्य करताना दिसल्याने महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे शेजारची मंडळी धावली. त्यांनी नराधम कमलेशला पकडून बेदम चोप दिला. संतप्त शेजाऱ्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत तो रामबागकडे पळाला. दरम्यान, जमावासह मुलीच्या आईने धंतोली ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार विजय आकोत यांनी मुलीच्या आईची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर लगेच आरोपीची शोधाशोध केली. त्यानंतर त्याला रामबाग, इमामवाडा परिसरात अटक करण्यात आली.

Web Title: Eight-year-old girl raped by neighbor in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.