नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
By नरेश डोंगरे | Updated: May 23, 2025 19:45 IST2025-05-23T19:44:20+5:302025-05-23T19:45:40+5:30
ED Raids in Nagpur: ईडीच्या अधिकाऱ्यांनी कावळे यांची प्रदीर्घ विचारपूस करून नंतर त्यांच्यासह ईतवारीतील सराफा ओळीत असलेले सागर ज्वेलर्स गाठले.

नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
नरेश डोंगरे, नागपूर
मध्य भारतातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांमधील बहुचर्चित नावे असलेल्या पुरूषोत्तम कावळे आणि लखोटिया बंधूसह चार ठिकाणी प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) छापे घातले. या कारवाईत नेमके काय जप्त करण्यात आले ते स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, ईडीच्या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संबंधित वर्तुळाच्या सूत्रांनुसार, रायपूर आणि नागपूरच्या ईडी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ५ ते ६च्या सुमारास सराफा व्यावसायिक पुरूषोत्तम कावळे यांच्या एम्प्रेस सिटीतील सदनिकेत धडक दिली. सोबतीला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही होता.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी कावळे यांची प्रदीर्घ विचारपूस करून नंतर त्यांच्यासह ईतवारीतील सराफा ओळीत असलेले सागर ज्वेलर्स गाठले. तेथील कागदपत्रे तपासण्यात आली. यावेळी सागर ज्वेलर्ससमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसत होता.
दुसरीकडे ईडीच्या एका पथकाने हवाला व्यावसायिक शैलेष लखोटिया यांच्या सेंट्रल एव्हेन्यू, छापरूनगरातील निवासस्थानी आणि चिखलीतील गोदामातही धडक दिली. बरीच चाैकशी केल्यानंतर लखोटियांना ईडीच्या पथकाने सोबत नेले. दरम्यान, नेमकी काय कारवाई झाली, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.
कावळेंवर यापूर्वीही झाली कारवाई
विशेष म्हणजे, कावळे मध्य भारतातील एक प्रमूख सराफा व्यावसायिक मानले जातात. तेअनेकांना सोन्याचांदीचे दागिने सप्लाय करतात.
कोट्यवधींच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात कावळे यांच्यावर गेल्या वर्षी डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेन्स (डीआरआय)ने मोठी कारवाई केली होती. त्यावेळी ट्रेनने सोन्याची तस्करी करणाऱ्या कावळेसह काही जणांकडून १८ कोटींचे सोने पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर कावळे यांना कारागृहात डांबण्यात आले होते. अनेक महिने ते कारतात.
हवालामुळेच घडले होते लखोटिया बंधू हत्याकांड
सूत्रांच्या माहितीनुसार, शैलेष लखोटिया गेल्या अनेक वर्षांपासून हवाला च्या गोरखधंद्यात सहभागी आहेत. ऑनलाईन सट्ट्यातही त्यांचे नाव घेतले जाते.
देशातील विविध प्रांतात त्यांचे नेटवर्क असल्याची चर्चा असून २००७-०८ मध्ये नागपुरात युपीच्या बच्चाबाबू गँगने हवालाची रक्कम लुटण्यासाठी त्यांच्या लकडगंजमधील कार्यालयात हल्ला केला होता.
यावेळी त्यांनी लखोटिया बंधूंची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यावेळीपासूनच लखोटिया आणि हवाला प्रकाशझोतात आले होते.