चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू

By Admin | Updated: September 5, 2016 02:44 IST2016-09-05T02:44:45+5:302016-09-05T02:44:45+5:30

खेळता-खेळता विहिरीत पडून एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना नंदनवन परिसरातील मयुरपेठ येथे शनिवारी दुपारी घडली.

Due to falling in the well of Chinmukulya | चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू

चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू

नंदनवन मयूरपेठ येथील घटना
नागपूर : खेळता-खेळता विहिरीत पडून एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना नंदनवन परिसरातील मयुरपेठ येथे शनिवारी दुपारी घडली.
भावेश राम धुर्वे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. भावेशची आई मोलकरणीचे काम करते. वडील आजारी असल्याने घरीच असतात. शनिवारी सकाळी भावेशची आई कामाला निघून गेली. घरी भावेश व त्याचे वडील होते. दुपारी ४ वाजता भावेश घरातून खेळण्यासाठी बाहेर पडला. घरासमोरच मोकळ्या प्लॉटवर जुनी विहीर आहे. त्या विहिरीचा वापर होत नाही. परिसरातील नागरिक त्यात कचरा टाकतात. जवळच एका घराचे काम सुरू आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाळू विहिरीजवळ ठेवण्यात आली आहे. असे सांगितले जाते की, भावेश रेतीच्या ढिगाऱ्यावर बसून खेळत होता. वाळूच्या ढिगाऱ्यावर तो घसरपट्टीसारखा खेळत होता. या दरम्यान तो विहिरीत पडला असावा. भावेश विहिरीत पडला तरी कुणालाच माहिती पडले नाही. काही वेळानंतर भावेशची आई घरी आली. मुलगा कुठेच दिसत नसल्याने ती त्याला शोधू लागली. परंतु तो कुठेच सापडला नाही. अचानक तिची नजर वाळूच्या ढिगाऱ्यावर गेली. काही दिवसांपासून भावेश तिथेच खेळत होता. तो घसरून पडल्याच्या खुणा दिसून आल्याने तो विहिरीत पडल्याचा संशय आला. विहिरीत कचरा असल्याने काहीच दिसत नव्हते. काही जणांनी विहिरीत गळ टाकून पाहिल्यावर भावेशचा मृतदेह आढळून आला.
भावेशच्या मृत्यूची माहिती होताच परिसरात शोक पसरला. पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह मेडिकलला नेला. भावेश हा आई-वडिलांना एकटाच होता. वडील गंभीर आजाराने ग्रस्त आहेत.
विहीर जमिनीवर सपाट आहे. त्याला सुरक्षा भिंत नाही. त्यामुळेच वाळूवर खेळताना तो घसरून विहिरीत पडल्याचा संशय आहे. विहिरीचे मालक आणि वाळू ठेवणाऱ्याचा निष्काळजीपणासुद्धा यातून दिसून येतो. पीएसआय प्रीती कुळमेथे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to falling in the well of Chinmukulya