नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. अखिलेश पेशवे; नियुक्तीवर अखेर शिक्कामोर्तब
By आनंद डेकाटे | Updated: May 18, 2026 20:37 IST2026-05-18T20:36:34+5:302026-05-18T20:37:06+5:30
Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अखेर नवीन प्र-कुलगुरू मिळाले असून डाॅ. अखिलेश पेशवे यांच्या नावावर सोमवारी अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.

Dr. Akhilesh Peshwa appointed as Pro-Vice Chancellor of Nagpur University; Appointment finally confirmed
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अखेर नवीन प्र-कुलगुरू मिळाले असून डाॅ. अखिलेश पेशवे यांच्या नावावर सोमवारी अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांच्या नियुक्तीला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सध्या ते धरमपेठ सायन्स काॅलेजचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
प्र-कुलगुरूपदाच्या शर्यतीत डॉ. पेशवे यांच्यासह डॉ. श्याम कोरेटी, डॉ. रविशंकर मोर आणि डॉ. योगेश भुते यांचीही नावे चर्चेत होती. या प्रतिष्ठित पदासाठी विद्यापीठ शिक्षण मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात वैचारिक चुरसही पाहायला मिळाली. मात्र, डॉ. पेशवे यांचे नाव समोर येताच सर्व सदस्यांनी एकमताने त्यांच्या नियुक्तीला पाठिंबा दिला.
पाच महिन्यांचा प्रतीक्षाकाळ संपला
डिसेंबर २०२५ मध्ये डाॅ. मनाली क्षिरसागर यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यानंतर प्र-कुलगुरू निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली होती. ही नियुक्ती लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, विविध कारणांमुळे प्रक्रिया दीर्घकाळ रखडली. मार्च महिन्यात यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती, परंतु अपरिहार्य कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर राज्यपाल कार्यालयाकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर सोमवारी जवळपास पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर डॉ. पेशवे यांच्या नियुक्तीला अंतिम स्वरूप देण्यात आले.
शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभवाची भक्कम पार्श्वभूमी
डॉ. अखिलेश पेशवे हे विदर्भातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. प्राचार्यपदासोबतच ते ‘भारतीय शिक्षण मंडळ’च्या विदर्भ प्रांताध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आर.एस. मुंडले धरमपेठ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये इंग्रजी विभागप्रमुख म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी म. पा. देव स्मृती विज्ञान महाविद्यालयात जवळपास दहा वर्षे प्राचार्य म्हणून काम पाहिले. इंग्रजी विषयात पीएचडी प्राप्त केलेल्या डॉ. पेशवे यांच्या व्यापक प्रशासकीय अनुभवाचा लाभ आता नागपूर विद्यापीठाला मिळणार आहे.