एसी कोचमध्ये श्वान; प्रवाशांनी केली थेट रेल्वे मंत्र्याकडे तक्रार; नागपूर ते हैदराबाद १० तास दुर्गंधी
By नरेश डोंगरे | Updated: April 16, 2026 22:19 IST2026-04-16T22:18:57+5:302026-04-16T22:19:21+5:30
राजधानी एक्सप्रेसमध्ये नाकतोंड दाबून प्रवास

एसी कोचमध्ये श्वान; प्रवाशांनी केली थेट रेल्वे मंत्र्याकडे तक्रार; नागपूर ते हैदराबाद १० तास दुर्गंधी
- नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रशासन प्रवाशांना ‘आरामदायी प्रवास’ देण्याचे दावे करत असते. प्रत्यक्षात मात्र जनरल कोच सोडा एसी फर्स्ट क्लासमध्येही प्रवाशांना कशा संतापजनक परिस्थित प्रवास करावा लागतो, याचा मासलेवाईक प्रकार राजधानी एक्सप्रेसमधील एका घटनेतून समोर आला आहे. आज नागपूर ते हैदराबाद प्रवासादरम्यान एसी कोचमध्ये तब्बल १० तास एका दुर्गंधी पसरवणाऱ्या श्वानासोबत प्रवास करावा लागल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. त्यामुळे नागपूरचे डॉ. संदीप शिरखेडकर यांनी याप्रकरणी थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार नोंदवत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले आहे.
डॉ. शिरखेडकर यांच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ते गाडी क्रमांक २२६९२ राजधानी एक्सप्रेसने हैदराबादकडे निघाले. डॉ. शिरखेडकर यांचा एच-१ कोचमधील सी-७ बर्थ होता. गाडी नागपूरहून सुटल्यानंतर काही वेळातच कोचमध्ये तीव्र दुर्गंधी येऊ लागली. सुरुवातीला हा त्रास नेमका कशामुळे होत आहे, हे समजत नव्हते. मात्र, पाहणी केली असता कोचच्या दाराजवळ एक मोकाट श्वान बसलेला दिसून आला.
प्रवाशांच्या मते, हा श्वान उन्हाच्या दाहकतेमुळे घाणीत लोळला असावा आणि तरीदेखिल बरे वाटत नसल्याने तो एसी कोचमध्ये शिरला असावा. त्याच्या सर्वांगाला लागलेल्या घाणीमुळेच तीव्र दुर्गंध येत होती. श्वानाला बाहेर हुसकावण्यासाठी काही प्रवाशांनी प्रयत्न केले. मात्र तो त्यामुळे आक्रमक होत भुंकू लागल्याने प्रवाशांनी माघार घेतली.
काही वेळेनंतर कोचमध्ये आलेल्या टीसीकडे श्वानाची तक्रार करण्यात आली; मात्र तपासणीचे औपचारिक काम पूर्ण केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने काढता पाय घेतल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. परिणामी, दुर्गंधीने भरलेल्या कोचमध्ये अनेकांना श्वास घेणे कठीण झाले. सततच्या भुंकण्यामुळे प्रवास अधिकच असह्य ठरला होता.
हैदराबाद येथे उतरल्यानंतर संतप्त प्रवाशांचा रोष उफाळून आला. त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार नोंदवत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, डॉ. शिरखेडकर यांनी या प्रकाराची तक्रार थेट रेल्वेमंत्र्यांना मेल वरून केली.
नियमांचे उल्लंघन?
डॉ. शिरखेडकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, रेल्वेच्या नियमानुसार एसी फर्स्ट क्लासमध्ये पाळीव प्राण्यांना परवानगी देण्यासाठी सर्व सहप्रवाशांची संमती आवश्यक असते. मात्र, कोणतीही संमती नसताना हा श्वान नागपूर ते हैदराबाद निर्धास्तपणे प्रवास करत राहिला, हे नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
भरमसाठ भाडे, ‘नाक दाबून’ प्रवास!
आरामदायी प्रवासासाठी ३ हजार रुपयांहून अधिक भाडे मोजूनही स्वतःसह इतर प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असले, तरी रेल्वेमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.