मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:46 IST2025-11-23T16:42:41+5:302025-11-23T16:46:54+5:30
Nagpur Crime news: पालकांची चिंता वाढणारी घटना नागपूरमध्ये घडली. एका १३ वर्षाच्या मुलीने मोबाईल न दिल्याच्या रागातून असा निर्णय घेतला की सगळ्यांनाच धक्का बसला.

मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
Nagpur Crime : मोबाईल दिला नाही म्हणून आल्याने राग आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिव्या सुरेश कोठारे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. चणकापूर येथील जय भोले नगर परिसरात शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी ही घटना घडली.
दिव्या कोठारे ही चणकापूर येथील वॉर्ड क्रमांक १ मधील महात्मा फुले शाळेत आठवीत शिकत होती. तिचे कुटुंब वॉर्ड क्रमांक ६, हनुमान नगर येथे राहते. २४ नोव्हेंबर रोजी तिच्या आत्याच्या मुलीचे लग्न असल्याने शुक्रवारी दिव्या आणि तिचे आई-वडील तसेच कुटुंबीय आत्याकडे कार्यक्रमासाठी गेले होते.
दिव्याची आत्या ही तिच्या घरापासून काही अंतरावरच राहते. दिव्याने संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोबाईल मागितला. मोबाईल न दिल्याने दिव्या नाराज झाली. रागाच्या भरात ती आत्याच्या घरातून निघून सरळ घरी आली. तेव्हा घरी कुणीच नव्हते. घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला तिने गळफास घेतला.
मोबाईलवरून झाला होता वाद, घेतला टोकाचाच निर्णय
ऑनलाइन क्लास आणि अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आला. त्याचा दैनंदिन वापर वाढू लागला. याचे दुष्परिणाम काही कुटुंबांना भोगावे लागत आहेत. अशाच तणावातून काही विद्यार्थ्यांची चिडचिड होते. मोबाईलचा हट्ट वाढताना दिसत आहे. दिव्याच्या बाबतीतही मोबाईलच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता.
सोशल मीडियाचा वापर
इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसारखी सोशल मीडिया अॅप ती नियमित वापरत होती. मोबाईलचा अतिवापर होत असल्याने अभ्यासाकडे तिचे दुर्लक्ष होत आहे, असे तिच्या काकांचे म्हणणे होते. यामुळे मोबाईल कमी वापर, अभ्यासाला प्राधान्य दे, अशी ताकीदही त्यांनी तिला दिली होती.
लग्नाचा आनंद क्षणात विरला
घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सावनेर येथील सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे यांनी अॅम्बुलन्ससह घटनास्थळी पोहोचून मदत केली. तेरा वर्षांच्या चिमुकलीने मोबाईल न मिळाल्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यामुळे तिचे कुटुंब कोलमडून गेले आहे. दोन दिवसांनी असलेल्या लग्नाचा आनंदही क्षणात विरून गेला.