नागपूर शहरातील ७६ विद्यार्थ्यांना ‘डेंटल फ्लोरोसिस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 10:33 AM2019-08-23T10:33:46+5:302019-08-23T10:36:28+5:30

दंतरोगशास्त्र विभागाने मनपाच्या १७ शाळेतील विद्यार्थ्यांच्या केलेल्या तपासणीत ‘फ्लोरोसिस’ आजार ७६ विद्यार्थ्यांमध्ये आढळून आला आहे.

'Dental fluorosis' to 76 students in Nagpur city | नागपूर शहरातील ७६ विद्यार्थ्यांना ‘डेंटल फ्लोरोसिस’

नागपूर शहरातील ७६ विद्यार्थ्यांना ‘डेंटल फ्लोरोसिस’

Next
ठळक मुद्देशा. दंत महाविद्यालयाचे निरीक्षण१७ शाळेत तपासणी

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अत्याधिक फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने होणारा दाताचा ‘फ्लोरोसिस’ आजार महानगरपालिकेच्या ७६ विद्यार्थ्यांमध्ये आढळून आला आहे. या आजारावर थेट उपचार नाहीत. ‘कॉस्मेटिक’ उपचार आहेत. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील बाल दंतरोगशास्त्र विभागाने मनपाच्या १७ शाळेतील विद्यार्थ्यांच्या केलेल्या तपासणीत हे वास्तव सामोर आले आहे.
मनपाच्या पाण्यामध्ये साधारण ‘.७२१ पीपीएम’ फ्लोराईड असते. पाण्यात एवढे फ्लोराईड असल्यास दाताला कीड लागत नाही. परंतु याचे प्रमाण वाढल्यास म्हणजे, ‘१ पीपीएम’पेक्षा जास्त गेल्यास ‘डेंटल फ्लोरोसिस’ होतो. विदर्भात भंडारा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम या पाच जिल्ह्यासह राज्यातील नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव या जिल्ह्यांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण सर्वधिक दिसून येते. काही ठिकाणी तर धोकादायकरीत्या ६ ते ९ पीपीएम पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे. अकोला, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांध्येही फ्लोराईडयुक्त पेयजलाची समस्या नव्याने आढळून आली आहे. हिंगणघाट येथील नदीच्या काठावर असलेल्या कवळघाट गावात प्रत्येक घरी ‘डेंटल फ्लोरोसिस’चे रुग्ण आढळून येतात. विहिरी आणि बोअरिंगच्या पाण्यात सर्वाधिक फ्लोराईड आढळून येते. विशेषत: जेवढ्या खोलातून पाणी उपसा होता तेवढे फ्लोराईड वाढते. सध्याच्या स्थितीत पाणी समस्येमुळे फ्लोराईडयुक्त पाण्याचा समस्येने डोके वर काढले आहे. हजारो नागरिक फ्लोरोसिस विकाराने ग्रस्त आहे. आता नागपुरातील मनपाच्या शालेय विद्यार्थ्यांमध्येही या विकाराचे चिंताजनक प्रमाण आढळून आले आहे. याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांचे म्हणणे आहे.
अशी केली तपासणी
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांच्या मार्गदर्शनात मनपा शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाढती दंत समस्या लक्षात घेऊन महापौर नंदा जिचकार यांच्या सूचनेनुसार शाळाशाळांमध्ये दंत तपासणी शिबिर सुरू केले. बाल दंतरोग शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रितेश कळसकर यांच्या नेतृत्वात आतापर्यंत मनपाच्या १७ शाळांमधील २५३८ विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. यात ७६ विद्यार्थ्यांमध्ये ‘डेंटल फ्लोरोसिस’ विकार आढळून आला.
मनपा आयुक्तांना माहिती देणार
१७ शाळेतील विद्यार्थ्यांच्या दंत तपासणीत ७६ विद्यार्थ्यांमध्ये ‘डेंटल फ्लोरोसिस’ आढळून आले आहे. मनपाच्या दोन झोनमधील शाळांमध्ये दंत तपासणी शिल्लक आहे. सर्व शाळांची तपासणी झाल्यावर याचा अहवाल महापौर व मनपा आयुक्तांना पुढील उपाययोजनेसाठी सादर केला जाईल.
 

‘कॉस्मेटिक’ हाच उपचार
‘डेंटल फ्लोरोसिस’ हा विकार जास्त फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने होतो. यामध्ये सुरुवातीला दातावर पांढरे डाग पडतात. त्यानंतर हेच डाग पिवळसर होऊन पुढे दातावर खड्डे पडतात. यावर ‘कॉस्मेटिक’ हाच उपचार आहे.
-डॉ. रितेश कळसकर
विभागप्रमुख, बाल दंतरोगशास्त्र विभाग


सर्वाधिक विद्यार्थी विवेकानंद हिंदी शाळेत
दंत तपासणीत सर्वाधिक ‘डेंटल फ्लोरोसिस’चे रुग्ण विवेकानंद हिंदी माध्यम शाळेत आढळून आले. येथील २७० विद्यार्थ्यांची तपासणी केली असता २६ विद्यार्थ्यांमध्ये हा विकार दिसून आला. त्यांना पुढील उपचारासाठी दंत रुग्णालयात बोलविण्यात आले आहे.

Web Title: 'Dental fluorosis' to 76 students in Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.