रिपोर्टला विलंब, उपचार कसे करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:08 AM2021-04-19T04:08:43+5:302021-04-19T04:08:43+5:30

तपासणी केंद्रावर गर्दी : नागरिक त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड चाचणीसाठी रांगा लावाव्या लागतात. त्यानंतर ...

Delay report, how to treat? | रिपोर्टला विलंब, उपचार कसे करणार?

रिपोर्टला विलंब, उपचार कसे करणार?

Next

तपासणी केंद्रावर गर्दी : नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड चाचणीसाठी रांगा लावाव्या लागतात. त्यानंतर रिपोर्टसाठी चार-पाच दिवस प्रतीक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत तातडीने उपचार कसे मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे कोरोना चाचणीचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळाला तर संक्रमण रोखण्याला मदत होणार असल्याने प्रशासनाने यादृष्टीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

कोविड रुग्णांना शासकीय व खासगी रुग्णालयात बेड मिळत नाही. दुसरीकडे गृहविलगीकरणात राहून तातडीने उपचार करायचे तर रिपोर्ट लवकर मिळत नाही. मागील काही दिवसांत तपासणीचे प्रमाण लक्षणीय वाढल्याने प्रयोगशाळांनी नमुने स्वीकारणे कमी केले. खासगी प्रयोगशाळांतून घरी जाऊन नमुने घेण्याचेही प्रमाण रोडावले. महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या ४२ केंद्रांवर तपासणी केली जाते.

एप्रिल महिन्यात रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढल्याने नागरिकांनीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून तपासणीवर भर दिला. त्यामुळे खासगी प्रयोगशाळेतून तपासणीची सेवा देणाऱ्यांनी घरी जाऊन नमुने घेणे बंद केले. परिणामी, सर्व चाचणी केंद्रांवर लक्षणीय गर्दी होत आहे. तपासणीसाठी केंद्रांवर रांगा लागत आहेत. व्यवस्था नसल्याने गर्दीमुळे संक्रमणाचाही धोका आहे. तपासणीसाठी बराच वेळ रांगेत राहावे लागते. दुसरीकडे पदाधिकारी व नेत्यांचे पाहणी दौरे व बैठका सुरू आहेत. मात्र परिस्थितीवर तोडग निघताना दिसत नाही. प्रशासन हतबल असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

....

उपचाराला विलंब, संक्रमणाचाही धोका

शासकीय केंद्रांवरून कोरोना तपासणीसाठी नमुने घेतल्यानंतर दोन ते तीन दिवस आणि खासगी प्रयोगशाळांनी नमुने घेतल्यास चार ते पाच दिवस लागत आहेत. रिपोर्ट लवकर मिळत नाही. दरम्यान, संक्रमित भटकंती करीत असतो. यात आजार गंभीर असल्यास अहवालाअभावी रुग्णालयात दाखल करून घेणे तर दूर, साधे उपचारही मिळत नसल्याने रग्ण अडचणीत सापडले आहेत.

Web Title: Delay report, how to treat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.