"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 08:57 IST2026-04-06T08:48:40+5:302026-04-06T08:57:49+5:30

नागपुरात एका विवाहितेन स्वतःला संपल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Come to my funeral tomorrow Nagpur Woman heartbreaking last note to husband | "उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!

"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!

नागपूर: "मी तुमच्यावर खूप प्रेम करते..." अशा शब्दांत आपल्या भावना चिठ्ठीद्वारे व्यक्त करत एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोराडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महादुला परिसरात घडली आहे. मयुरी मेंढे असे मृत विवाहितेचे नाव असून, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

​नेमकं प्रकरण काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, मयुरीचे लग्न झाले होते. मात्र गेल्या काही काळापासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. या कौटुंबिक कलहामुळे मयुरी मोठ्या मानसिक तणावात होती. पतीसोबतचे वाद न सुटल्यामुळे ती महिनाभरापूर्वीच आपल्या माहेरी (महादुला) परतली होती.

​शेवटचा फोन आणि हताश मन

​आत्महत्येपूर्वी मयुरीने आपल्या पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. तिने वारंवार फोन केला, मात्र पतीने फोन उचलला नाही. पतीकडून प्रतिसाद न मिळाल्याने ती प्रचंड हताश झाली आणि याच नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले.

​घरातील मंडळी बाहेर असताना संपवले जीवन

​घरातील सदस्य काही कामासाठी बाहेर गेले होते, हीच संधी साधून मयुरीने घरात गळफास लावून घेतला. रात्री जेव्हा कुटुंबीय घरी परतले, तेव्हा त्यांना घर आतून बंद असल्याचे आढळले. संशय आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा मयुरी मृतावस्थेत आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

​भावूक सुसाईड नोट जप्त

पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत तिने पतीवर असलेले प्रेम व्यक्त करतानाच, मनातील दुःख आणि सोसलेला मानसिक त्रास मांडला आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून ती तपासाचा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

काय म्हटलंय शेवटच्या चिठ्ठीत?

"मी तुमच्यावर खूप प्रेम करते संदीप, तुम्ही मला समजून घेत नाही. दीड महिन्यापासून मी तुम्हाला रोज समजवत होते. मला रोज एक आशा होती की तुम्ही मला समजून घ्याल. पण तुम्ही समजायला तयार नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्हाला समजून थकले म्हणून तुमच्या पासून खूप दूर जात आहे. याला जिम्मेदार तुम्ही आहात संदीप. तुम्हाला वेळ मिळत नाही. आता तुम्हाला सुट्टी घ्यायची गरज पडणार नाही. उद्या रविवार आहे माझ्या अंत्ययात्रेला या. तुमची मयुरी नवरी बनून तयार आहे तुम्ही दिलेली साडी घालून. तुम्हाला माझा जो फोटो आवडायचा तशीच तयार झाली आहे. या वेळ काढून. तुम्ही मला मजबूर केलं म्हणून मी तुमच्या मुळे आत्महत्या करते आहे," असं या चिठ्ठीत म्हटलं आहे.

​माहेरच्यांचे गंभीर आरोप

​मयुरीच्या माहेरच्यांनी तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पतीकडून मिळणाऱ्या सततच्या मानसिक त्रासामुळेच मयुरीने हे पाऊल उचलल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मयुरीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
 

Web Title : विवाहित महिला ने सुसाइड नोट में पति को ठहराया जिम्मेदार, आत्महत्या की।

Web Summary : नागपुर: एक विवाहित महिला ने वैवाहिक कलह के चलते आत्महत्या कर ली, सुसाइड नोट में पति को जिम्मेदार ठहराया। उसने आत्महत्या से पहले बार-बार उससे संपर्क करने की कोशिश की। परिवार ने मानसिक उत्पीड़न का आरोप लगाया, पुलिस जांच कर रही है।

Web Title : Married woman ends life, blames husband in suicide note.

Web Summary : Nagpur: A married woman committed suicide due to marital discord, leaving a note blaming her husband. She repeatedly tried contacting him before the act. Family alleges mental harassment, police investigate.