दूषित पाण्यामुळे नागरिकांचा उद्रेक

By Admin | Updated: May 16, 2014 00:51 IST2014-05-16T00:51:24+5:302014-05-16T00:51:24+5:30

पाचपावली येथील गोंडपुरा भागात मागील काही दिवसांपासून नळातून दूषित पाणी येत आहे. परंतु याकडे लक्ष दिले जात नसल्याने संतप्त नागरिकांनी दूषित पाणी घेऊन गुरुवारी सतरंजीपुरा येथील

Citizen outbreak due to contaminated water | दूषित पाण्यामुळे नागरिकांचा उद्रेक

दूषित पाण्यामुळे नागरिकांचा उद्रेक

नागपूर : पाचपावली येथील गोंडपुरा भागात मागील काही दिवसांपासून नळातून दूषित पाणी येत आहे. परंतु याकडे लक्ष दिले जात नसल्याने संतप्त नागरिकांनी दूषित पाणी घेऊन गुरुवारी सतरंजीपुरा येथील ओसीडब्ल्यू कार्यालयावर धडक दिली आणि अधिकार्‍यांच्या समोरच दूषित पाणी ओतून समस्येकडे लक्ष वेधले.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पाचपावली परिसरातील गोंडपुरा वस्तीमध्ये नळामधून दूषित पाणी येत आहे. दररोज दुपारी १२ वाजता त्यांच्या वस्तीत नळ येतो. परंतु नळ सुरू करताच दूषित पाणी येते. तब्बल ४ तास दूषित पाणी जाऊ दिल्यानंतर नळाला कापड लावून पाणी भरावे लागते. यानंतरही त्याच्यातील दूषितपणा जात नाही. पाण्यात फिटकरी टाकावी लागते. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वस्तीतील महिला ज्युली उके, मंदा मसराम, माया उईके, काजल गेडाम आदी महिला आजारी पडल्या आहेत. या परिसरातील नागरिकांनी बहुतांश यासंबंधात अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या परंतु काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी दूषित पाणी बॉटलमध्ये भरले आणि ओसीडब्ल्यूच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना आपली समस्या समजावून सांगत त्यांच्यासमोरच दूषित पाणी ओतले. अधिकार्‍यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. येत्या दोन दिवसात समस्या दूर करण्याचे आश्‍वासन दिले आणि पाण्याचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन बिसेन यांच्यासह अमित उके, गोपाल वाणी, सुरज उके, नितेश गेडाम, रवी मसराम, सचिन उके, धवन आतराम, पंकज हटवार आदींसह नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होते. (प्रतिनिधी)

Web Title: Citizen outbreak due to contaminated water