विवाहामुळे संपले बलात्काराचे प्रकरण

By Admin | Updated: April 20, 2016 03:26 IST2016-04-20T03:26:07+5:302016-04-20T03:26:07+5:30

तक्रारकर्ती महिला व आरोपीने विवाह केल्यामुळे बलात्काराचे प्रकरण संपविण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित एफआयआर रद्द करून या दाम्पत्याला दिलासा दिला आहे.

Case of rape: Married | विवाहामुळे संपले बलात्काराचे प्रकरण

विवाहामुळे संपले बलात्काराचे प्रकरण

हायकोर्टाचा दिलासा : सुखी कौटुंबिक जीवनासाठी एफआयआर रद्द
नागपूर : तक्रारकर्ती महिला व आरोपीने विवाह केल्यामुळे बलात्काराचे प्रकरण संपविण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित एफआयआर रद्द करून या दाम्पत्याला दिलासा दिला आहे.
१७ आॅक्टोबर २०१५ रोजी महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ४२०, ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदविला होता. तक्रारकर्ती महिला व आरोपी जवळचे नातेवाईक आहेत. महिलेचे हे तिसरे लग्न होय. २०११ मध्ये तिने पहिले लग्न केले होते. पहिल्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यानंतर तिने दुसरे लग्न केले. पोलीस तक्रारीनुसार, आरोपीने महिलेच्या चारित्र्यावरून दुसऱ्या नवऱ्याचे कान भरले होते. यामुळे दुसऱ्या नवऱ्यानेही तिला घटस्फोट दिला. यानंतर आरोपीने लग्नाचे आमीष देऊन तिच्यासोबत जवळीक साधली. तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. वासना पूर्ण झाल्यावर आरोपीने लग्नास नकार दिला. परिणामी महिलेने पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविला होता.
पोलिसांची चौकशी सुरू झाल्यानंतर आरोपी व महिलेने सामंजस्याने वाद मिटवून लग्न केले. त्यांना एक मुलगीही झाली आहे. दोघेही आनंदात राहात आहेत. ‘एफआयआर’मुळे त्यांच्या संसारात अडथळे निर्माण होत होते. परिणामी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी दोघांच्या सुखी संसारासाठी व प्रकरणातील तथ्ये लक्षात घेता एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला. यावेळी आरोपी व महिलेचा भाऊ न्यायालयात उपस्थित होते. पोलिसांनी चौकशी करून आरोपी व तक्रारकर्त्या महिलेने लग्न केल्याची माहिती न्यायालयाला दिली होती.(प्रतिनिधी)

Web Title: Case of rape: Married