नागपूर : व्यवसायात नुकसान झाल्यानंतर तणावात असलेल्या एका तरुण व्यावसायिकाने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्याने मौदा येथे पोहोचून आईला फोन करून ‘हा माझा शेवटचा’ फोन आहे असे सांगितले. मात्र पोलिसांना याची माहिती मिळताच तत्परतेने मोबाईलच्या माध्यमातून त्याचे लोकेशन शोधून त्याचा शोध घेत त्याचा जीव वाचविण्यात आला. पोलिसांच्या तत्परता व समयसूचकतेमुळे अवसान गळालेल्या पालकांना मुलाला परत भेटता आले.संबंधित व्यावसायिकाचा वाडी परिसरात कारखाना आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी जेसीबी खरेदी केल्या. मात्र त्या भाड्याने देताना हवा तसा मोबदला न मिळाल्याने त्याचे खूप नुकसान झाले. यामुळे तो तणावात गेला. त्याने यातूनच स्वत:चा जीव देण्याचा टोकाचा निर्णय घेतला. २८ जून रोजी तो गाडीने घरातून निघाला. तो फुटाळा तलावाजवळ पोहोचला पण आत्महत्या करण्याचे धाडस त्याला करता आले नाही. सोमवारी तो मौदा येथे नदीवर पोहोचला. त्याने त्याची गाडी पार्क केली. नदीत उडी मारण्यापूर्वी, पंकजला त्याच्या ६ वर्षांच्या मुलीची आठवण आली व त्याने आईला फोन केला. त्याने तिला हा शेवटचा फोन असून मुलीची तसेच पत्नीची काळजी घे असे म्हटले. त्याचे रडतानाचे बोलणे ऐकून त्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने त्याला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला.अगदी मातृत्वाची शपथ देत परत येण्यास सांगितले. मात्र त्याने मी जीवन संपवतो आहे असेच उत्तर दिले. दरम्यान, त्याच्या वडिलांनी वाडीतील एएसआय विनोद कांबळे यांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी लगेच त्याच्या मोबाईलचे लोकेशन शोधले व तो मौदा येथे नदीजवळ असल्याची बाब समोर आली. पोलिसांचे पथक त्या दिशेने रवाना झाले. मौदा येथील स्थानिक पोलिसांनादेखील माहिती देण्यात आली. इकडे त्याच्या पत्नीने त्याला फोन करून परत येण्यास सांगितले. मात्र तो त्याच्या भूमिकेवर कायम होता. तिने त्याला बोलण्यात गुंतविले. तेवढ्या वेळात पोलीस व स्थानिक लोक तेथे पोहोचले. त्यांना पाहताच व्यावसायिकाने फोन ठेवला व त्याने थेट नदीत उडी मारली. ते पाहून पोलीस व स्थानिक लोकांनीदेखील नदीच उड्या मारत त्याला बाहेर काढले. त्याला सुखरुपपणे वाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याचे समुपदेशन करण्यात आले.
नवऱ्याला जिवंत पाहताच धाय मोकलून रडली पत्नीदरम्यान, व्यावसायिकाच्या कुटुंबियांची या संपूर्ण कालावधीत अगदी वाईट अवस्था झाली होती. तो जिवंत परत येईल की नाही हीच चिंता त्यांना सतावत होती. त्याला सुखरूप डोळ्यासमोर पाहताच त्याच्या कुटुंबियांतील सदस्य धाय मोकलून रडले व असा अविचार न करण्याबाबत अक्षरश: हात जोडून विनंती केली. वाडी पोलीस ठाण्याच्या तत्परतेचे त्याच्या कुटुंबियांनी आभार मानले.