विजेची मागणी वाढल्याने अनेक भागांत ब्रेकडाउन; वितरण यंत्रणा 'ऑक्सिजन'वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 15:20 IST2026-05-16T15:16:30+5:302026-05-16T15:20:24+5:30
Nagpur : नागपूर शहराचा समावेश असलेल्या महावितरणच्या शहर मंडळाच्या इतिहासात प्रथमच विजेची मागणी ९०० मेगावॉटच्या पुढे गेली असून शुक्रवारी ती तब्बल ९१४ मेगावॉटवर पोहोचली.

Breakdowns in many areas due to increased demand for electricity; Distribution system on 'oxygen'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराचा समावेश असलेल्या महावितरणच्या शहर मंडळाच्या इतिहासात प्रथमच विजेची मागणी ९०० मेगावॉटच्या पुढे गेली असून शुक्रवारी ती तब्बल ९१४ मेगावॉटवर पोहोचली. वाढत्या उष्णतेमुळे आणि वापरातील प्रचंड वाढीमुळे शहरातील वीज वितरण यंत्रणा अक्षरशः 'ऑक्सिजन'वर आली आहे. पॉवर ट्रान्सफॉर्मरपासून वितरण व्यवस्थेतील अनेक उपकरणांवर अतिरिक्त भार पडल्याने महावितरण आणि महापारेषण प्रशासन 'अलर्ट मोडवर' गेले आहे. शुक्रवारी दुपारनंतर हवामानात काहीसा बदल झाल्याने अधिकाऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला.
फेब्रुवारी २०२६ मध्ये शहराची वीज मागणी ४७० मेगावॉट होती. अवघ्या काही महिन्यांत हा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे. यापूर्वी मे २०२५ मध्ये ८२१ मेगावॉटची उच्चांक मागणी नोंदविण्यात आली होती. मात्र, यंदा एप्रिलमध्येच मागणी ८७५ मेगावॉटवर गेली आणि आता मे महिन्यात ती ९१४ मेगावॉटवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण आणि महापारेषणच्या अधिकाऱ्यांना रात्रीही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३३ केव्ही आणि ११ केव्ही क्षमतेच्या सर्व प्रणाली सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून आवश्यक असल्यास कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी आउटसोर्स एजन्सींची मदत घेतली जात आहे.
मानकापूर लाइनमधील बिघाडामुळे महाराजबाग फीडर गुरुवार-शुक्रवार मध्यरात्री २:३३ ते ३:२० या वेळेत बंद पडला. त्यामुळे भार बेसा आणि पारडी उपकेंद्रांकडे वळवावा लागला. महापारेषणच्या पारडी-छत्रपती लाइनवरील भार वाढल्याने पांडे ले-आउट, साई मंदिर परिसर आणि वर्धा रोडलगतच्या भागांत अंधार पसरला. पीडब्ल्यूडीकडून केबल तुटल्याने काँग्रेसनगरमधील सुमारे ३,६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. बोरगाव येथील महेशनगरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे अनेक तास वीज गायब होती. देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे मेडिकल परिसरासह अन्य काही भागांतही वीजपुरवठा प्रभावित झाला.
अशी वाढली विजेची मागणी
महिना कमाल मागणी
मे २०२५ ८२१ मेगावॉट
फेब्रुवारी २०२६ ४७० मेगावॉट
मार्च २०२६ ६४५ मेगावॉट
एप्रिल २०२६ ८७५ मेगावॉट
मे २०२६ ९१४ मेगावॉट
शहर मंडळाची व्यवस्था
३३ केव्ही उपकेंद्रे - १०३
११ केव्ही उपकेंद्रे - ३०८
११ केव्ही फीडर - ८१८
पॉवर ट्रान्सफॉर्मर - १५३
वितरण ट्रान्सफॉर्मर - १२,३४३
एलटी लाइन - ९५८ कि.मी.
"शहरातील वीज मागणी प्रथमच २०० मेगावॉटच्या पुढे गेली आहे. लेंड्रा पार्क येथील नव्या उपकेंद्रातील केबल एक-दोन दिवसांत कार्यान्वित केली जाणार असून कोराडी आणि उप्पलवाडी लाइनची दुरुस्तीही लवकर पूर्ण होईल. जाटतरोडी उपकेंद्रावरील भार कमी करण्याचे काम सुरू असून सोमवारपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल."
- सतीश अणे, मुख्य अभियंता महापारेषण