रेल्वेला बॉम्बस्फोटाची धमकी, पण यंत्रणा तयार ; सुरक्षेचा ‘फुल प्रूफ’ प्लॅन

By नरेश डोंगरे | Updated: May 13, 2025 18:13 IST2025-05-13T18:08:32+5:302025-05-13T18:13:15+5:30

यंत्रणांकडून रेल्वेला सुरक्षेचे कवच : ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर, गाड्यांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त

Bomb threat to railways, but systems ready; 'Full proof' security plan | रेल्वेला बॉम्बस्फोटाची धमकी, पण यंत्रणा तयार ; सुरक्षेचा ‘फुल प्रूफ’ प्लॅन

Threat to bomb train

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून मोठा घातपात करण्याची धमकी मिळाल्याने राज्यच नव्हे तर देशभरातील सुरक्षा यंत्रणांनी रेल्वेला सुरक्षेचे कवच घातले आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांसह सशस्त्र जवानांकडून रेल्वे गाड्या आणि ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दहशतवाद्यांकडून भारतात घातपात घडवून निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलाच धडा शिकविला आहे. अवघ्या तीन दिवसांत अनेक खुंखार दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले आहे. भारताकडून एअर बेस नष्ट करून पाकिस्तानचे कंबरडे मोडले गेल्यामुळे शस्त्रसंधीसाठी पाकिस्तान गयावया करीत होता. मात्र,शस्त्रसंधी झाल्यानंतरही त्याची खुमखुमी जिरलेली नाही. ते लक्षात घेऊन भारताकडून कडक उपाययोजना केल्या जात असतानाच सोमवारी रेल्वेत बॉम्ब स्फोट घडविण्याची धमकी देणारा मेसेज सुरक्षा यंत्रणांना मिळाला आहे. त्याची अत्यंत गंभीरपणे दखल घेण्यात आली असून, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील रेल्वे प्रशासनांना, सुरक्षा यंत्रणांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

रेल्वेतील सिरियल ब्लास्टच्या आठवणी

११ जुलै २००६ ला दहशतवाद्यांनी मुंबईतील वेगवेगळ्या लोकल ट्रेनमध्ये ११ मिनिटात सात बॉम्बस्फोट घडवून आणले होते. ज्यात १८९ लोकांचे जीव गेले तर, ८०० पेक्षा जास्त निरपराध नागरिकांना जीवघेण्या जखमा झाल्या होत्या. माहिम, बांद्रा, मीरा रोड, माटूंगा, खार, जोगेश्वरी आणि बोरीवली रेल्वे स्थानकावर पोहचलेल्या लोकलमध्ये हे स्फोट झाले होते. आरडीएक्स आणि अमोनिअम नायट्रेटच्या माध्यमातून घडवून आणलेल्या या शक्तीशाली स्फोटांच्या आठवणी आज १९ वर्षानंतरही ताज्याच आहेत.

सर्वत्र कडक बंदोबस्त : अतिरिक्त महासंचालक साळुंके
धमकीच्या मेसेजची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त लावण्यात आला असून रेल्वे गाड्यांमध्येही कसून तपासणी केली जात आहे. सुरक्षेसंबंधाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती तिरिक्त पोलीस महासंचालक (रेल्वे) प्रवीण साळुंके यांनी या संबंधाने 'लोकमत'शी बोलताना दिली.

बीडीडीएससह सशस्त्र जवानांकडूनही तपासणी : आरपीएफ आयुक्त आर्य

दपूम रेल्वे सुरक्षा दलाकडे डिव्हीजनमध्ये नागपूरसह सात ठिकाणी बॉम्ब शोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथके आहेत. तर, नागपूर आणि गोंदियात श्वान पथकेही आहेत. ही सर्व पथके २४ तास अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहेत. बीडीडीएससह सशस्त्र जवानांकडून वेळोवेळी रेल्वे स्थानके आणि गाड्यांची तपासणी केली जात असल्याची माहिती, आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी लोकमतला दिली.

Web Title: Bomb threat to railways, but systems ready; 'Full proof' security plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.