मोदी-शहांबद्दलच्या विधानावरुन भाजपचा पलटवार, प्रकाश आंबेडकरांना जबरी टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 17:05 IST2023-01-31T17:05:27+5:302023-01-31T17:05:40+5:30
प्रकाश आंबडेकर यांच्या विधानावर भाजपच्या उन्मेश पाटील यांनी पलटवार केला होता, ज्या व्यक्तीने आपले कुटुंब, आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले आहे.

मोदी-शहांबद्दलच्या विधानावरुन भाजपचा पलटवार, प्रकाश आंबेडकरांना जबरी टोला
देशात २०२४ च्या निवडणुकीनंतर बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध करण्यात आला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा साधला होता. आंबेडकरांच्या या विधानामुळे भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला असून प्रकाश आंबेडकरांवर ते पलटवार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आंबेडकरांना टोला लगावला आहे.
प्रकाश आंबडेकर यांच्या विधानावर भाजपच्या उन्मेश पाटील यांनी पलटवार केला होता, ज्या व्यक्तीने आपले कुटुंब, आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले आहे. देशासाठी अहोरात्र राबणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांविषयी बोलताना जनाचा नाही तर मनाचा विचार करायला हवा. प्रकाश उर्फ बाळासाहेब तुमच्या नावाच्या मागे आंबेडकर आहे, म्हणून आम्ही आदर करतोय. यावेळी माफ करतो पण इथून पुढे अशी चूक केल्यास भाजप, युवा मोर्चा, कार्यकर्ते आणि देशाचे नागरिक सहन करणार नाही, असा इशाराच उन्मेश पाटील यांनी दिला होता. आता, चंद्रशेखर बावनकुळे यांनीही टीका केली आहे.
“वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत विक्षिप्तपणाने हे वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत जे बोलले ते मानसिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. आमच्या नेतृत्त्वावर टीका टिप्पणी केली तर राज्यभरात निषेध व्यक्त करावा लागेल, अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे, त्याचा उद्रेक होईल,” असा शब्दात बावनकुळे यांनी आंबेडकरांवर पलटवार करत इशारा दिला आहे.
काय म्हणाले होते आंबेडकर
देशातील मतदार हा देशाचा पालक आहे. त्यामुळे भिती कशाला बाळगायची. आणि हाच मतदार देशाचा मालक आहे, हे दाखवण्यासाठी मी असे म्हणेन, 2024 मध्ये बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकेल, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.