महापालिका निवडणुकांमध्ये विदर्भात भाजप-काँग्रेसची असणार परीक्षा, हेविवेट नेत्यांना लागणार कस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:35 IST2025-05-07T11:34:54+5:302025-05-07T11:35:23+5:30
Nagpur : नागपुरात मुख्यमंत्री, गडकरी, बावनकुळेंकडे राहणार प्रचाराची धुरा

BJP-Congress will face a test in Vidarbha in the municipal elections, heavyweight leaders will have to fight
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुका न झाल्याने मार्च २०२२ पासून विदर्भातीलनागपूर, अमरावती, चंद्रपूर व अकोला महापालिकेचे प्रशासन प्रशासकांच्या हाती आहे. पुढील चार महिन्यांत निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः विदर्भातील या चारही महानगरपालिकांमध्ये भाजप व कांग्रेसमध्ये प्रमुख टक्कर आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांचा कस लागणार आहे. विशेष म्हणजे चंद्रपुरात भाजपकडून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर प्रचाराची धुरा देण्यात येते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्रशासक राज येण्यापूर्वी अकोल्यात ४८ नगरसेवक असलेल्या भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता होती. तर नागपुरात भाजपकडे १०८ नगरसेवकांसह सत्तेची चावी होती. तर अमरावती व चंद्रपूरमध्येदेखील भाजपचीच सत्ता होती.
चंद्रपूरमध्ये गटबाजीमुळे भाजप-काँग्रेसची अग्निपरीक्षाच
चंद्रपूर जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या प्रभावी नेतृत्व म्हणून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे बघितले जाते. भाजप आणि काँग्रेसमध्ये वाढलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षांची अग्निपरीक्षाच राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असले तरी संघटनात्मकदृष्ट्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पकड मजबूत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात मुनगंटीवारांना स्थान न मिळाल्याने त्यांना डावलल्याचे चित्र आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुनगंटीवारांवर भाजप परत विश्वास टाकणार की नव्या फळीला संधी देणार, यावर बरीच समीकरणे अवलंबून ठरतील.
नागपुरात काँग्रेससमोर आव्हान
नागपुरात भाजपकडे १०८ नगरसेवक होते व लोकसभा-विधानसभा निवडणुकीतदेखील भाजपचाच वरचष्मा दिसून आला. भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर लगेच बूथ पातळीवर संघटन मजबुतीसाठी प्रयत्न सुरू केले होते. दुसरीकडे काँग्रेसनेदेखील विविध उपक्रम राबवत कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पक्षातील गटबाजी कायमच असून त्यामुळे तिकीटवाटपादरम्यान अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, गडकरींचे शहर असलेल्या नागपुरात काँग्रेससमोर मोठे आव्हान राहणार आहे.
अमरावतीत कुणाचा खेला होणार?
अमरावती महानगरपालिकेत २२ प्रभाग असून ८७नगरसेवक तथा पाच स्वीस्कृत सदस्यांसह एकूण ९२ नगरसेवक आहेत. २०१७ मधील निवडणुकीत भाजपचे ४५, काँग्रेस १५, एमआयएम १०, शिवसेना (ठाकरे गट) ७, बसपा ५, युवा स्वाभिमान पार्टी ३, रिपाइं (आठवले गट) १ आणि एक नगरसेवक अपक्ष निवडून आले होते. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने खातेही उघडले नव्हते. मात्र आता अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, विधान परिषद सदस्य संजय खोडके हे पती-पत्नी राजकीय शक्तीनिशी येत्या महानगरपालिका निवडणूक मैदानात उतरतील. तसेच शिवसेना दोन गटात विभागल्या गेल्याने ठाकरे आणि शिंदे सेना आमने-सामने असतील. विधानसभेत अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, प्रहारचे बच्चू कडू यांचादेखील पराभव झाल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर काँग्रेससमोर मतदारांना परत खेचून आणण्याचे आव्हान आहे.