एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरुपदी उज्ज्वला चक्रदेव यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST2021-09-12T04:11:50+5:302021-09-12T04:11:50+5:30

नागपूर : नागपुरातील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला शिरीष चक्रदेव यांची मुंबई येथील श्रीमती नाथीबाई ...

Appointment of Ujjwala Chakradev as Vice Chancellor of SNDT Women's University | एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरुपदी उज्ज्वला चक्रदेव यांची नियुक्ती

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरुपदी उज्ज्वला चक्रदेव यांची नियुक्ती

नागपूर : नागपुरातील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला शिरीष चक्रदेव यांची मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. डॉ उज्ज्वला चक्रदेव यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्हीआरसीई येथून वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एमटेक, तसेच वास्तुविद्याशास्त्र शिक्षण या विषयात पीएचडी प्राप्त केली.

डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएचडी पर्यवेक्षक म्हणून काम केले असून, त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर ३६ वर्षांचा अनुभव लाभला आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ २ जुलै २०२१ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी छत्तिसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती न्या. यतिंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. पुणे येथील आयआयआयटीचे महासंचालक डॉ. अनुपम शुक्ला व राज्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली.

Web Title: Appointment of Ujjwala Chakradev as Vice Chancellor of SNDT Women's University