सरकार कुणाचेही बनले तरी शेतकरी हिताचे काम व्हावे : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 10:00 PM2019-11-22T22:00:25+5:302019-11-22T23:21:58+5:30

कुठलेही सरकार बनले तरी शेतकरी हिताची कामे होणे महत्त्वाचे आहे व ते आपण करुन घेऊ. सत्तेत कोण आहे व कोण नाही हा प्रश्न गौण आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

:Any government should work for the benefit of Farmers : Nitin Gadkari | सरकार कुणाचेही बनले तरी शेतकरी हिताचे काम व्हावे : नितीन गडकरी

सरकार कुणाचेही बनले तरी शेतकरी हिताचे काम व्हावे : नितीन गडकरी

Next
ठळक मुद्दे‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सद्यस्थितीत प्रसारमाध्यमांना राज्यात कुणाचे सरकार बनेल यात जास्त रस आहे. मात्र सरकार कुणाचेही बनलं तरी कामे व्यवस्थितच होतील. कुठलेही सरकार बनले तरी शेतकरी हिताची कामे होणे महत्त्वाचे आहे व ते आपण करुन घेऊ. सत्तेत कोण आहे व कोण नाही हा प्रश्न गौण आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 


यावेळी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खा.रामदास तडस, खा.अशोक नेते, आ.गिरीश व्यास, आ.मोहन मते, अ‍ॅड.सुलेखा कुंभारे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर संदीप जोशी, माजी महापौर नंदा जिचकार, ‘युपीएल’ समूहाचे अध्यक्ष रज्जुभाई श्रॉफ, ‘अ‍ॅग्रोव्हिजन’च्या सल्लागार समितीचे प्रमुख डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकऱ्यांना समृद्ध व सशक्त करायचे असेल तर सिंचनाच्या सुविधा वाढवाव्या लागतील. सिंचन वाढले तर शेतकरी आत्महत्या कमी होतील. विदर्भात ५० टक्क्यांहून सिंचन झाले तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. यादृष्टीने मागील पाच वर्षांत बरीच कामे झाली व आणखी कामे जोमाने करायची आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. 

मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांची उत्पादकक्षमता वाढली आहे. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. शेतकरी बदलला तर गावे बदलतील व प्रगती होईल, असे प्रतिपादन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कृषी म्हणजे कला, विज्ञान, अध्यात्म, संशोधन, अनुभव यांचा संगम आहे. तरुण मुले शेतीला करिअर म्हणून निवडत नाही. शेती जेव्हा नफ्याची होईल, तेव्हा लोक याचकडे वळतील. त्यामुळे कृषीक्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर देण्याची गरज आहे, असे अनिल बोंडे म्हणाले. यावेळी ‘क्रिस्टल कॉप’चे चेअरमन नंदकिशोर अग्रवाल, ‘आयसीएआर’चे संचालक डॉ.पी.चंद्रन, ‘सीड फेडरेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ.टी.रामास्वामी, ‘वेद’चे अध्यक्ष शिवकुमार राव, महाउर्जाचे व्यवस्थापकीय संचालक कांतिलाल उमप हेदेखील उपस्थित होते. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले.

‘पतंजली’ प्रकल्पाला पुढील महिन्यात सुरुवात
‘फूड प्रोसेसिंग’साठी बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ने पुढाकार घेतला आहे. काही दिवसाअगोदरच या प्रकल्पासंदर्भात त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे व प्रकल्पाच्या कामाला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

पारंपरिक पिके भविष्य बदलवू शकत नाही
यावेळी नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व बदल आत्मसात करण्याचादेखील सल्ला दिला. पारंपरिक पिके लावून शेतकऱ्यांचे भविष्य बदलू शकत नाही. शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला पूरक उद्योगदेखील सुरू केले पाहिजे. शेतीचे यांत्रिकीकरण झाले पाहिजे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. आपल्या देशात कांदा आयात करावा लागला याचे वाईट वाटले असेदेखील ते म्हणाले.

‘बेटी बटाओ’प्रमाणे गाईंचे संवर्धन व्हावे
ज्याप्रमाणे देशात ‘बेटी बचाओ’ मोहीम चालू आहे त्याचप्रमाणे गाईंचेदेखील संवर्धन झाले पाहिजे. आपल्या देशात असे तंत्रज्ञान तयार झाले आहे, ज्यामुळे ९० टक्के दुभत्या गाईंचाच जन्म होईल. यामुळे दुध उत्पादन आणखी वाढेल, असे गडकरी म्हणाले.

Web Title: :Any government should work for the benefit of Farmers : Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.